Join us

“महाराष्ट्रात अनेकांचे डोळे उघडण्याची गरज”; राज ठाकरेंचे सूचक वक्तव्य; म्हणाले, “माझे प्रयत्न...”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 4:36 PM

Raj Thackeray : मुंबईतत एका कार्यक्रमात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात अनेकांचे डोळे उघडण्याची गरज असल्याचे म्हटलं आहे.

MNS Raj Thackeray :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या रोखठोक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. अनेकदा राज ठाकरे हे तुफान फटकेबाजी करताना सूचक वक्तव्ये करताना दिसतात. अशातच आता महाराष्ट्रात अनेकांचे डोळे उघडण्याची गरज असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या एका कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी हे विधान केलं आहे. त्यामुळे आता राज ठाकरे यांनी हे विधान नेमकं कोणाला उद्देषून केले याची चर्चा सुरु झाली आहे.

मुंबईत रविवारी डॉक्टर नितीन देशपांडे यांनी श्री रामकृष्ण नेत्रालय हे डोळ्यांचं रुग्णालय सुरू केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते श्री रामकृष्ण नेत्रालय या हॉस्पिटलचं उद्घाटन झाले. यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला डोळे उघडण्याची गरज असून त्यासाठी काही उपकरण आहे का असा सवाल डॉक्टरांना विचारला. तसेच महाराष्ट्रात अनेकांचे डोळे उघडण्यासाठी माझे प्रयत्न सुरुच असल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

“हॉस्पिटलमध्ये जाऊन डोळे दाखवण्याची वेळ कधी आली नाही. पण ज्या प्रकारची उपकरणे आता डोळ्यांसाठी आलेली आहेत ती पाहूनच थक्क व्हायला होतं. मला आतापर्यंत फक्त ए बी सी दिसतोय का विचारतात एवढंच माहिती होतं. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मी तुमची एक टूर आयोजित करु इच्छितो. जेणेकरुन आताची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता अनेक लोकांचे डोळे उघडण्याची गरज आहे. त्याचे काही यंत्र तुमच्याकडे असेल तर मला सांगा. माझे प्रयत्न सुरुच आहेत,” असे राज ठाकरे यांनी म्हटलं.

दुसरीकडे, राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीत राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी स्वबळावर लढण्यासाठी चाचपणी केली. “आपण २०० जागांवर निवडणूक लढणार असून मी कोणाच्याही पुढे जागावाटपाची चर्चा करायला जाणार नाही. कुठल्याच पक्षाचा जागांचा फॉर्म्युला ठरलेला नाही. त्यामुळे आपल्या पक्षाची भूमिका काय आहे हेच तुम्हाला सांगायचे आहे,” असे राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.

टॅग्स :राज ठाकरेमुंबईमनसेमहाराष्ट्र