Join us

Maharashtra CM Battle, NCP vs BJP: "पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा की शिवसेनेचा हे काळच ठरवेल, पण..."; NCPचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांचे सूचक ट्वीट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 6:43 PM

राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी केलं ट्वीट

Maharashtra CM Battle, NCP vs BJP: महाराष्ट्रात २०१९च्या अखेरीस शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांनी मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. शिवनेसेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. या सरकारची आणखी अडीच वर्षे शिल्लक आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतल्यानंतर, 'पुढील मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसचा होऊ दे', असं देवीला साकडं घातल्याचं सांगितलं. तर 'पुढील २५ वर्षे उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री राहतील', असे खासदार संजय राऊत म्हणाले. या दोघांच्या विधानांवर उत्तर देताना, पुढील मुख्यमंत्री स्वबळावर निवडून येईल आणि तो भाजपाचाच असेल', असा विश्वास भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंनी व्यक्त केला होता. आता त्यावर, राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

राष्ट्रवादीचं भाजपाला रोखठोक प्रत्युत्तर

महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री नक्की कोणत्या पक्षाचा असेल, यावर गेल्या दोन दिवसांपासून विविध विधानं ऐकायला मिळू लागली आहेत. त्यातच भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी, पुढचा मुख्यमंत्री हा कुठल्याही फोडाफोडी, तिघाड्यांमधून नाही तर जनतेच्या स्पष्ट बहुमताच्या बळावर निवडून येईल आणि तो मुख्यमंत्री भाजपाचाच असेल, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यांच्या या दाव्याला राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी प्रत्युत्तर दिले आहे. "भाजपने लक्षात ठेवावे की पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा की शिवसेनेचा होईल हे काळच  ठरवेल, परंतु तुमचा "मी पुन्हा येईन" बोलणारा  नेता पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही ही गाठ मनाशी बांधावी", असे उत्तर क्रास्टो यांनी दिले.

भाजपाचे केशव उपाध्ये काय म्हणाले होते?

भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. "महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाल्यास सगळ्या आमदारांसह दर्शनाला येईन, असा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी तुळजाभवानी मातेला केलेल्या नवसाची कालपासून चर्चा आहे. खरंतर कट्टर पुरोगामी मंडळी मंदिरांचे उंबरठे झिजवून देवांना नवससायास करू लागतीत, हे एक आश्चर्यच म्हटलं पाहिजे. बाकी आता देवीच्या आशीर्वादानं राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर पुढील २५ वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील, या शिवसेना प्रवक्ते, प्रख्यात ज्योतिषी सामनावीर संजय राऊत यांनी केलेल्या दाव्याचं काय होणार? की हा दावा खरा ठरण्यासाठी आणि सुप्रियाताईंचा नवसही पूर्ण व्हावा यासाठी मध्यममार्ग म्हणून उद्धव ठाकरेंच्या हाती घड्याळ बांधणार? म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहिले म्हणून राऊत समाधानी आणि राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला, म्हणून सुप्रियाताईही समाधानी", असा खोचक टोला उपाध्ये यांनीही लगावला होता. तसेच, "तुम्ही कितीही दावे तरी पुढचा मुख्यमंत्री हा कुठल्याही फोडाफोडी, तिघाड्यांमधून नाही तर जनतेच्या स्पष्ट बहुमताच्या बळावर निवडून येईल आणि तो मुख्यमंत्री भाजपाचाच असेल!!!", असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.

टॅग्स :उद्धव ठाकरेमुख्यमंत्रीशरद पवारदेवेंद्र फडणवीस