Join us

लोकांचे लक्ष वेधण्यासाठी काही गोष्टी बोलल्या जाताय; सोमय्यांवरील आरोप हास्यस्पद- फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 12:38 PM

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

मुंबई- मुंबईतील पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीसह त्यांच्या निकटवर्तीयांची ११.१५ कोटींच्या मालमत्ता जप्त केली. जप्त मालमत्तांत राऊत यांच्या पत्नीच्या नावावरील दादरच्या फ्लॅटसह निकटवर्तीयांच्या रायगड व पालघरमधील मालमत्तांचा समावेश आहे. 

प्रवीण राऊत यांच्या नावे असलेल्या पालघर जिल्ह्यातील जमिनीसह राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत तसेच स्वप्ना पाटकर या दोघींच्या नावावरील अलिबागमधील किहिम बीच येथील ८ प्लॉटसह वर्षा राऊत यांच्या नावावरील दादर येथील फ्लॅटवर ईडीने टाच आणली. राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या स्वप्ना पाटकर पत्नी आहेत. किहिम बीच येथील ८ प्लॉटच्या खरेदी व्यवहारात नोंदणी, इतर बाबींचे रोख व्यवहार झाले आहेत.

ईडीने संजय राऊत यांच्यावर कारवाई केल्यानंतर भाजपा चांगलीच आक्रमक झाली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. काही लोकांचा नखं कापून शहिद होण्याचा प्रयत्न आहे. तसेच लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी काही गोष्टी बोलल्या जातात. संजय राऊतांना पुराव्याच्या आधारे नोटीस मिळाली आहे, त्यांनी कायद्याने उत्तर द्यावे असेही फडणवीस म्हणाले. आमच्या अनेक नेत्यांच्या घरात माणसे घुसवत त्यांना नोटीसा देत आहेत. आम्ही कायद्याने त्यांचा मुकाबला करु, असेही फडणवीस म्हणाले. 

विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा सोमय्यांनी घोटाळा केल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला. सोमय्यांनी देशाशी गद्दारी केली आहे. त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा. राज्याच्या हद्दीत हा गुन्हा घडल्यानं राज्यातील तपास यंत्रणांनी कारवाई करायला हवी. देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असल्यानं केंद्रीय तपास यंत्रणांनीदेखील तपास करायला हवा, असं राऊत यांनी म्हटलं. 

संजय राऊतांच्या या आरोपावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर केलेले आरोप हास्यास्पद आहे. मात्र काळजी करायचे कारण नाहीत कितीही दबावाची कारवाई केली तरी, सोमय्या बोलायचे बंद करणार नाहीत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादीची कितवी टीम- फडणवीस

मनसे ही भाजपची सी टीम असल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आली होती. त्यांच्या या टिकेलाही देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. माझा शिवसेनेला सवाल आहे की, शिवसेना  काँग्रेस, राष्ट्रवादीची कितवी टीम आहे. एक मुख्यमंत्रीपद घेऊन  तुम्ही पक्षाची काय अवस्था केली आहे. आपल ठेवायचा झाकून आणि दुसऱ्याच बघायच वाकून हे जरा बंद करा असा टोलाही फडणवीसांनी सेनेला लगावला.

टॅग्स :संजय राऊतदेवेंद्र फडणवीसभाजपाशिवसेना