Join us

Maharashtra: हजारांहून अधिक ग्रंथपाल आता पूर्णवेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 8:03 AM

Maharashtra: मागील अनेक वर्षांपासून वेतनश्रेणीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अर्धवेळ ग्रंथपालांना आता पूर्णवेळ करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. राज्यात पूर्णवेळ ग्रंथपालांची २,११८ पदे मंजूर आहेत.

 मुंबई : मागील अनेक वर्षांपासून वेतनश्रेणीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अर्धवेळ ग्रंथपालांना आता पूर्णवेळ करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. राज्यात पूर्णवेळ ग्रंथपालांची २,११८ पदे मंजूर आहेत. सध्या पूर्णवेळ ९२६ पदे कार्यरत असून, आता १,१९२ अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ ग्रंथपाल म्हणून काम करण्याची संधी मिळेल.शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयात, भविष्यात अर्धवेळ ग्रंथपालपदांचा संवर्ग कमी होत जाणार आहे, शिवाय नवीन पदभरती वा पदनिर्मितीही करण्यात येणार नसल्याचेही नमूद केले आहे. शालेय शिक्षण धोरणानुसार सुमारे ५०० वर विद्यार्थीसंख्येमागे अर्धवेळ, तर सुमारे १ हजार विद्यार्थीसंख्येमागे पूर्णवेळ ग्रंथपाल नियुक्ती करण्यात येते. गेली अनेक वर्षे या धोरणात बदल केलेले नाही. त्यामुळे राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत गेली. २०१९ च्या शिक्षकेतर पदाच्या आकृतीबंधानुसार पूर्णवेळ ग्रंथपालपदासाठी पटसंख्येचे निकष इयत्ता ६ वी ते १२ वीमधील १ हजार विद्यार्थी असा करण्यात आला. राज्यात सध्या सुमारे २ ते ३ हजार विद्यार्थी संख्या असलेल्या २८० तर ३ हजारांहून अधिक संख्या असलेल्या ५३ शाळा आहेत. या २८० शाळांमधील २८० तर ५३ शाळांतील १०६ अशा सुमारे ३८६ ग्रंथपालांना या शाळांमध्ये प्राधान्याने पूर्णवेळ ग्रंथपाल म्हणून सामावून घेतले जाणार आहे. 

टॅग्स :वाचनालयमुंबई