Join us

महाराष्ट्र पक्षिमित्र पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : हियर ऑन प्रोजेक्ट एन्व्हार्नमेंट अर्थात होप या संस्थेकडून महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनामध्ये दरवर्षी दोन पुरस्कार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : हियर ऑन प्रोजेक्ट एन्व्हार्नमेंट अर्थात होप या संस्थेकडून महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनामध्ये दरवर्षी दोन पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांसाठी महाराष्ट्र पक्षिमित्रकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यामधून उदयोन्मुख पक्षिनिरीक्षक पुरस्कार सातारा येथील चिन्मय प्रकाश सावंत यांस, तर उदयोन्मुख पक्षिमित्र पुरस्कार सोलापूर येथील राहुल श्रीकृष्ण वंजारी व भंडारा येथील मृणाली कमलाकर राऊत या दाेघांना जाहीर झाला.

उदयोन्मुख पक्षिनिरीक्षक हा पुरस्कार २० वर्षांपेक्षा लहान वय असलेल्या विद्यार्थ्यास दिला जात असून, यावर्षी या पुरस्कारासाठी चिन्मय प्रकाश सावंत याची निवड करण्यात आली. चिन्मय हा विज्ञान पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत असून, महाराष्ट्र पक्षिमित्र व बीएनएचएसचा सभासद आहे. उदयोन्मुख पक्षिमित्र हा पुरस्कार २८ वर्षांपेक्षा लहान वय असलेल्या तरुणास दिला जात असून, यावर्षी या पुरस्कारासाठी दोघांची निवड करण्यात आली आहे. सोलापूर येथील राहुल श्रीकृष्ण वंजारी व भंडारा येथील मृणाली कमलाकर राऊत यांना हा पुरस्कार जाहीर झाला. वाणिज्य शाखेचा पदवीधर असलेल्या राहुल वंजारी याने २००८ पासून पक्षिनिरीक्षनास सुरुवात केली असून, आजवर त्याने त्याच्या परिसरात ३०० पेक्षा जास्त पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या. अनेक पक्ष्यांच्या घरट्यांचा अभ्यास केला. या महत्त्वपूर्ण नोंदी व अनुभव त्याने आजवर ८ इंग्रजी निबंध आणि ६ मराठी लेखांच्या माध्यमातून प्रसिद्ध केले आहेत, तर मृणाली राऊत ही सूक्ष्मजीवशास्त्र या विषयाची पदवीधर असून, तिला परिसरातील पक्षी तसेच जैवविविधता अभ्यास व नोंदणीत विशेष रुची आहे. तिने आजवर परिसरातील अनेक पक्षी व फुलपाखरे यांच्या नोंदी घेतल्या आहेत. पुरस्कारांचे वितरण येत्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येईल. यावर्षी ३४ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन सोलापूर येथे होणार असल्याची माहिती महाराष्ट्र पक्षिमित्रतर्फे संस्थेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी दिली.

...............................