लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र ही बलिदानाची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा आणि स्वराज्याची मशाल हाती घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ हा विचार त्यांनी देशाला दिला. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वात आत्मनिर्भर भारताचे स्वप्न सत्यात उतरले आहे. त्यात महाराष्ट्राचे योगदान मोलाचे आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीत महाराष्ट्र हा आधारस्तंभ आहे, असे प्रतिपादन नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी साेमवारी ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ या पुरस्कार सोहळ्यात केले.
या सोहळ्याचे प्रमुख अतिथी असलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनी अस्खलित मराठीत भाषण करून उपस्थितांची मने जिंकली. माझी कर्मभूमी मध्य प्रदेश तरी जन्मभूमी, कौटुंबिक संबंधांची भूमी महाराष्ट्राची आहे. मंत्री आणि खासदार म्हणून नव्हे तर मराठी माणूस म्हणून मी आलो आहे. महाराष्ट्र औद्योगिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रांत अव्वल आहेच; पण बलिदान व संस्कृतीची भूमी हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे. क्रांती व परिवर्तनाच्या प्रारंभाची ही भूमी आहे. छत्रपती शिवरायांची ही भूमी आहे, शक्तिशाली भारताचे रूप त्यांच्या मनात होते. एक भारत श्रेष्ठ भारताचा विचार शिवाजी महाराजांनी दिला. अहत तंजावर तहत पेशावर सर्व मुलूख आपला. सप्तसिंधू आणि सप्तगंगा मुक्त करा, हर हर महादेवची घोषणा त्यांनी दिली. हेच एक भारत श्रेष्ठ भारताचे विचार घेऊन आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पंतप्रधानांच्या नेतृत्वात सत्यात उतरल्याचे त्यांनी सांगितले.
दर्डा परिवाराशी माझ्या परिवाराचे तीन पिढ्यांचे स्नेहपूर्ण संबंध आहेत. माझे आजोबा आणि विजयबाबू दर्डा यांचे वडील, माझी आजी आणि विजयबाबूंचे वडील, माझे वडील आणि विजयबाबू आणि आता मी व दर्डा परिवार असे हे अतूट नाते असल्याचे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले.
‘लोकमत’ म्हणजे विश्वास... सत्य..! विश्वास आणि सत्याच्या आधारावर ‘लोकमत परिवारा’ने लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ऐतिहासिक कार्य केले आहे. लोकमत म्हणजे सत्य, लोकमतने महाराष्ट्रातील जनतेच्या मनात विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. महाराष्ट्रातील गाव, तालुका, जिल्ह्यातील नवरत्नांना राष्ट्रीय पटलावर आणून त्यांना सन्मानित करण्याचा हा ‘लोकमत’चा कार्यक्रम सलग नऊ वर्षे सुरू आहे. विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्यांच्या सन्मानाचा हा सोहळा सर्वांसाठीच प्रेरणादायी असून, त्यासाठी दर्डा परिवाराला मी धन्यवाद देतो, असे गौरवोद्गार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी यावेळी काढले.