मुंबई - महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांच्या तत्परतेमुळे पश्चिम बंगालमधील एका आत्महत्या करणाच्या मानसिकतेत असलेल्या तरुणीचे प्राण वाचले. यासंबंधी इन्स्ट्रागामवरून माहिती मिळाल्यानंतर तेथील पोलीस प्रशासनाला संपर्क साधून कळवल्याने त्यांनी तिला आत्महत्येपासून परावृत केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सायबर विभाग २४ तास समाज माध्यमांवर निगराणी ठेवून आहे. यादरम्यान एक मुलगी आत्महत्या करणार असल्याची पोस्ट इंस्टाग्रामवर आढळून आली. महानिरीक्षक यशस्वी यादव यांना कळताच, त्यांनी संभाव्य घटनेचे गांभीर्य ओळखून सायबर सेलमधील तज्ज्ञांकडून संबंधित मुलीच्या अकाऊंटचे डिटेल्स तात्काळ शोधून काढले. ते पश्चिम बंगालमधील बराकपूर येथील आढळून आले. त्यांनी तातडीने बराकपूर सायबर सेलचे पोलीस अधिकारी सत्यजित मंडल यांच्याशी संपर्क साधून संबंधित मुलीचा मोबाईल क्रमांक व सविस्तर माहिती दिली. बराकपूर पोलिसांनी तत्परतेने त्या मुलीचा शोध घेऊन तिला आत्महत्येपासून परावृत्त केले. थोडा जरी उशीर झाला असता तरी मुलीचा जीव गेला असता. पण सुदैवाने योग्यवेळी संपर्क झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला .
महाराष्ट्र पोलिसांचा 'तो' कॉल अमूल्य ठरला; तत्परतेमुळे बंगाली तरुणी आत्महत्येपासून परावृत्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 9:32 PM