मुंबई- आज राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली. राष्ट्रवादीतील ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीतील ३० आमदारांचा शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर छगन भुजबळ यांच्यासह अन्य नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. कालच राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकमत डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांच्या संदर्भात मोठं विधान केलं होतं. 'अजित पवार Vs. सुप्रिया सुळे असं दहा जन्मात होणार नाही, असं विधान सुळे यांनी केलं होतं, तर आज दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष झाल्यानंतर खासदार सुळे यांनी पहिल्यांदाच मुलाखत दिली. लोकमत व्हिडीओचे संपादक आशिष जाधव यांनी लोकमत डॉट कॉमवर खासदार सुप्रिया सुळे यांची मुलाखत घेतली.या मुलाखतीत सुळे यांनी अनेक राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला होता.
समृद्धी अपघातातील मृतांवर सामुहिक अंत्यसंस्कार; नातेवाईकांच्या आक्रोशात प्रशासनाची धावपळ
गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात पक्षांतर्गत सामना असल्याची चर्चा आहे. या चर्चेवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवार आणि सुप्रिया सुळे सामना असं दहा जन्मात होणार नाही. कारण दादा माझा मोठा भाऊ आणि नेता आहे. माझ्यावर आणि दादावर जे संस्कार झाले आहेत ते पदासाठी नाही तर आम्ही दोघ राजकारणात बदल घडवण्यासाठी आलो आहोत. हे फक्त दादाचं आणि माझं नाही तर राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याबद्दल हेच माझ्या मनात आहे, असं सांगून सुप्रिया सुळे यांनी या चर्चांना पूर्ण विराम दिला होता.
तर आज दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी अजित पवार यांना ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. यामुळे आता राज्याच्या राजकारणात भविष्यात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार असा सामना रंगणार का अशा चर्चा सुरू आहेत.