मुंबई- शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीतील ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे दिसत आहे. दोन दिवसापूर्वी या मंत्र्यांना खात्यांचे वाटपही करण्यात आले आहे. उद्यापासून विधीमंडळीचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील नेते खासदार शरद पवार यांच्या भेटीसाठी वाय बी चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले. शरद पवार यांच्यासोबत अर्धा तास चर्चा करुन परत हे नेते अजित पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. दरम्यान, या भेटीत नेमकी चर्चा काय झाली. याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी वाय बी चव्हाण सेंटरमध्ये नेमकी काय चर्चा झाली यासह संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
मोठी बातमी! अजित पवार यांच्या गटातील नेते शरद पवारांच्या भेटीला; राजकीय हालचालींना वेग
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, विरोधी पक्षांची बैठक सुरू होती तेव्हा अचानक सुप्रिया सुळे यांचा मला फोन आला, त्यांनी मला वाय बी चव्हाण सेंटरला यायला सांगितलं. या ठिकाणी मंत्रिपदाची शपथ घेतलेले नऊ नेते हे सर्व उपस्थित होते. त्यांनी शरद पवार साहेब यांच्याकडे दिलगीरी व्यक्त केली. यावेळी त्यांनी यावर मार्ग काढण्याची विनंती केली. त्यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
'आता ते येऊन भेटले हे अनपेक्षित आहे. शरद पवार यांच्यासोबत बैठक होईल तेव्हा यावर चर्चा होईल. त्या नऊ मंत्र्यांनी पवार साहेबांच्याकडे कंत व्यक्त करुन दिलगीरी व्यक्त केली. लार्जर इटरेस्ट ठेऊन सगळ्यांना एकत्र कराव अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली, यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली नाही, असंही जयंत पाटील म्हणाले.
अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातीव नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी वाय बी चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले. यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या. राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार यांचा एक गट तर शरद पवार यांचा एक गट, असे राष्ट्रवादीत दोन गट पडले होते. दरम्यान, आता या फुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवार गटातील नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी वाय बी चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले होते.