मुंबई - राज्यातील सत्तानाट्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं. या राजकीय संघर्षात महाराष्ट्रात सत्तांतर घडून शिंदे-भाजपा सरकार स्थापन झाले. मात्र आता खरी लढाई विधानसभेच्या सभागृहात पाहायला मिळणार आहे. शिंदे सरकारला बहुमत चाचणीतून जावं लागणार आहे. त्यासाठी ३ आणि ४ जुलै रोजी विशेष अधिवेशन घेण्यात आले आहे.
३ जुलैच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. विद्यमान उपाध्यक्ष नाना झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक होईल. या निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपाकडून आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर त्याविरोधात महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांना उभं करण्यात आले आहे. विधानसभेत आवाजी मतदानाने ही निवडणूक पार पडेल. तत्पूर्वी सत्ताधारी-विरोधक दोन्ही पक्षांनी आमचाच उमेदवार निवडून येईल असा दावा केला आहे.
त्यातच माजी उपमुख्यमत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आजच्या अध्यक्ष निवडीच्या मतदानावेळी हजर राहण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. अजित पवार यांना कोरोना झालाय, त्यांची तब्येत बरी नाही. बहुतेक येतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे. तर शिवसेना पक्षप्रमुखांनी नेमलेला व्हिप हा कायद्याने लागू होतो. त्यामुळे सुनील प्रभू हेच प्रतोद राहतील. कायदेशीर लढाई पुढे होईल असंही पाटील यांनी सांगितले.
शिवसेनेत 'व्हिप'वरून संघर्षमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने प्रतोद म्हणून नेमलेले भरत गोगावले यांनी भाजपा-शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान करण्यासाठी व्हिप काढला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान करण्यासाठी पक्षादेश काढला आहे. त्यामुळे नेमका व्हिप कुणाचा? यावरून एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात संघर्ष होत असल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदे यांच्यासोबत ३९ तर ठाकरे गटात १६ आमदार आहेत. शिंदे गटातर्फे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी राहुल नार्वेकर यांना मतदानाचा व्हिप काढला तर ठाकरे गटातर्फे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी साळवी यांना मतदान करण्याचा व्हिप जारी केला. राष्ट्रवादी व काँग्रेसने साळवी यांना, तर भाजपने नार्वेकर यांना मत देण्याचा व्हिप काढला आहे.