Maharashtra Political Crisis: शिंदे गटाशिवायही भाजपा बहुमत चाचणी जिंकू शकते; समजून घ्या विधानसभेतलं गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 02:02 PM2022-06-29T14:02:26+5:302022-06-29T14:03:12+5:30

महाराष्ट्र विधानसभेत एकूण २८८ जागा आहेत. त्यातील शिवसेनेच्या एका आमदाराचं निधन झाले आहे. त्यामुळे ही संख्या २८७ इतकी आहे.

Maharashtra Political Crisis: BJP can win majority test without Shinde faction; Understand the number game in the assembly | Maharashtra Political Crisis: शिंदे गटाशिवायही भाजपा बहुमत चाचणी जिंकू शकते; समजून घ्या विधानसभेतलं गणित

Maharashtra Political Crisis: शिंदे गटाशिवायही भाजपा बहुमत चाचणी जिंकू शकते; समजून घ्या विधानसभेतलं गणित

Next

मुंबई - मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात उद्धव ठाकरेंसमोर मोठं आव्हान निर्माण झाले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गुरुवारी ३० जूनला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावत सरकारला बहुमत चाचणी करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे विधानसभेत गुरुवारी फ्लोअर टेस्ट होणार आहे. सकाळी ११ वाजता अधिवेशनाला सुरूवात होईल. सायंकाळी ५ पूर्वी चाचणी पूर्ण करावी लागेल. राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यामुळे सभागृहात उद्धव ठाकरे बहुमत चाचणी सिद्ध करतील का हे पाहणं गरजेचे आहे. 

राज्यपाल यांनी म्हटलं की, राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती मला देण्यात आली आहे. शिवसेनेचे ३९ आमदार महाविकास आघाडी सरकारच्या बाहेर पडल्याचं चित्र आहे. त्यात ७ अपक्ष आमदारांनी पत्र पाठवून उद्धव ठाकरे सरकारचं समर्थन परत घेतल्याचं राजभवनाला कळवलं आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला सभागृहात बहुमत चाचणी करावी लागेल असं सांगण्यात आले आहे. 

सभागृहात बहुमत चाचणीची वेळ आल्यास नंबरगेम महत्त्वाचा ठरू शकतो. शिवसेनेकडे सध्या ५५ आमदार आहेत. ज्यात ३९ आमदार उद्धव ठाकरेंच्याविरोधात आहेत. हे बंडखोर आमदार मागील ९ दिवसांपासून गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडी सरकारमधील २ आमदार कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तर २ सदस्य जेलमध्ये आहेत. म्हणजे एकूण ४३ आमदारांचं गणित महाविकास आघाडीचं सरकार बिघडवू शकतं. तर महाविकास आघाडी समर्थक प्रहारचे २ इतर ७ अपक्ष आमदारांनी मविआ सरकारपासून अंतर ठेवले आहे. 

दुसरीकडे शिवसेनेने १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली आहे. त्याबाबत सुप्रीम कोर्टात निर्णय प्रलंबित आहे. शिंदे गट हा तांत्रिक मुद्दा असल्याचं सांगत असले तरी बंडखोर आमदारांचा मार्ग सोपा नाही. शिवसेनेचे ३९ आमदार शिंदे गटाकडे आहेत. अशावेशी दोन तृतीयांश आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. त्यामुळे पक्षांतरबंदीचा कायदा त्यांना लागू होत नाही. हे आमदार भाजपासोबत युती करा अशी आग्रही मागणी करत आहेत. त्यामुळे भाजपासाठी सत्तास्थापनेचा मार्ग सुकर आहे. आता प्रश्न असा आहे की, गुवाहाटीत जे आमदार आहेत ते शिंदे यांच्यासोबतच आहेत का त्यातील काही उद्धव ठाकरे गटात सहभागी होतील. महाराष्ट्र विधानसभेत काहीही होऊ शकते. कारण उद्धव ठाकरे यांच्याकडील नेते सातत्याने बंडखोर आमदारांपैकी काहीजण संपर्कात असल्याचा दावा करत आहेत. 

काय आहे गणित?
महाराष्ट्र विधानसभेत एकूण २८८ जागा आहेत. त्यातील शिवसेनेच्या एका आमदाराचं निधन झाले आहे. त्यामुळे ही संख्या २८७ इतकी आहे. अशावेळी सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी १४४ आमदारांची गरज आहे. राष्ट्रवादीकडे ५३, काँग्रेसकडे ४४ आणि शिवसेनेकडे ५५ आमदार आहेत. या तिन्ही पक्षांची बेरीज १५२ इतकी आहे. त्याशिवाय मविआमधील घटक पक्षही समाविष्ट आहेत. परंतु शिवसेनेत बंडखोरी झाल्यामुळे गणित बिघडलं. 

मविआ सरकारकडे बहुजन विकास आघाडीचे ३, सपा, २ आणि इतर ११ आमदारांचे समर्थन आहे. दुसरीकडे भारतीय जनता पार्टीकडे १०६ आमदार आहेत. ७ अपक्ष आणि अन्य आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे. सध्याच्या घडीला भाजपाकडे ११३ आमदारांचे पाठबळ आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना अपात्र ठरवले किंवा त्यांना मतदानापासून वंचित ठेवले तरी बहुमत आकडा भाजपाला सहज गाठता येईल. २८७ आमदारांसाठी १४४ आमदारांचे पाठबळ हवं. परंतु शिंदे गटाचे ३९ आमदार बहुमत चाचणीत सहभागी झाले नाहीत तर बहुमतासाठी १२१ आमदारांची गरज लागेल. अशावेळी भाजपाकडे ११३ आणि इतर १६ आमदारांचे पाठबळ आहे. हा आकडा १२९ पर्यंत पोहचतो. त्यामुळे उद्धव ठाकरे बहुमत सिद्ध करण्यात अयशस्वी ठरतील. 

Web Title: Maharashtra Political Crisis: BJP can win majority test without Shinde faction; Understand the number game in the assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.