Join us

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंनाही काय झाडी, काय डोंगारची भुरळ, आमदाराला म्हणाले वन्स मोर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 4:31 PM

सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या या वाक्याची भुरळ संपूर्ण महाराष्ट्राला पडलेली आहे.

मुंबई - नेत्यांचा कार्यकर्त्यांशी संवाद होतच असतात. मात्र, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अस्थिर बनलेली असताना सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी एका कार्यकर्त्याशी साधलेला अस्सल सोलापुरी ग्रामीण ढंगातील ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील.. ओके !’ हा संवाद तुफान व्हायरल झाला. विशेष म्हणजे गाण्याच्या रूपातूनही हा संवाद पुढे आला. टी-शर्टांवरही झळकला. जगभरातून लाखो लाईक्स, संवादाच्या गाण्याला मिळत आहेत. हे गाणं आता एकनाथ शिंदेंपर्यंतही पोहोचलं आहे.

सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या या वाक्याची भुरळ संपूर्ण महाराष्ट्राला पडलेली आहे. अशात महराष्ट्रापासून दूर असले तरीही मनाने महाराष्ट्रात असलेल्या एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्यासोबतच्या सर्व आमदार महोदयांना या वाक्याची भुरळ पडली नसेल तरच नवलच. आज सकाळी सगळे आमदार हॉटेलच्या लॉबीत आले असता, एकनाथ शिंदेंसह सर्वांनीच शहाजी बापूंचं मनापासून कौतुक केलं. तसेच, पुन्हा एकदा हा डायलॉग म्हणून दाखवण्याची  विनंती केली. त्यानंतर, त्यांनीही हा डायलॉग बोलून दाखवला, त्यावेळी सर्वत्र हशा पिकला. 

एकनाथ शिंदेंनी शहाजी पाटील यांना हे त्यांचं सुपरहिट वाक्य पून्हा एकदा म्हणून दाखवण्याची विनंती केली, तसेच हे वाक्य किती व्हायरल झालय आणि त्याची लोकांनी गाणी तयार केलीत हेदेखील दाखवून दिलं. यावेळी नक्की काय गम्मत घडली ती आता कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या हाही व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

शहाजी पाटील प्रकाशझोतात

शिवसेनेत बंड केल्यावर एकनाथ शिंदे जेवढे प्रकाशझोतात आले, त्यापेक्षा अधिक शहाजीबापू आले ते त्यांच्या अस्सल सोलापुरी ग्रामीण ढंगातील संवादामुळे. बंडानंतर शिंदे यांच्या गटात गेेलेल्या काही मंत्री, आमदारांसह शहाजीबापू सध्या गुवाहाटीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये असताना त्यांनी कार्यकर्त्याशी साधलेल्या संवादानंतर ‘बापू’ राज्यात चांगलेच ट्रेंडमध्ये आले आहेत. बापूंच्या या संवादातून रचलेल्या या गाण्यानं सोशल मीडियाने दुष्काळग्रस्त सांगोल्याला देश-विदेशात पोहोचवलं आहे.

 

टॅग्स :एकनाथ शिंदेसांगोलासोलापूरआमदारगौहती