मुंबई- महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी मोठी घडामोड झाली. विरोधी पक्षातील असलेल्या राष्ट्रवादी पक्षातील ९ नेत्यांनी शिंदे -फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे दिसत आहे. आता पक्षातील नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही मोठा गौप्यस्फोट केला आहे.
"माझ्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी माझा फोटो वापरायचा नाही"; शरद पवारांची 'वॉर्निंग'
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी भाजपसोबत जाण्यासाठी प्रयत्न केला होता, असा गौप्यस्फोट केला. आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, आमदार दिलीप बनकर यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना एक पत्र दिलं होतं. या पत्रात त्यांनी शरद पवार यांना एकटं सोडू आणि आपण भाजपसोबत जाऊया, असं लिहिलं होतं. हे पत्र पाहून जयंत पाटील ढसाढसा रडले होते, असा मोठा गौप्यस्फोट आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. या गौप्यस्फोटवरुन आता यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलबेल नव्हतचं अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. (Maharashtra Political Crisis)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर काही वेळातच हे पत्र जयंत पाटील यांना देण्यात आले होते,पाटील यांनी हे पत्र शरद पवार यांच्याकडे दिलं नव्हतं. पवार यांना हे वाचून काय वाटलं असतं, असे आमदार पत्र लिहूच कसं शकतात असं म्हणून जयंत पाटील रडले होते, असंही आव्हाड म्हणाले.
बंडखोरीला सुरुवातील शरद पवारांनी (Sharad Pawar) संयमी भूमिका घेतली होती. मात्र आता शरद पवारांनी चांगलीच रोखठोक भूमिका मांडली आहे. ज्यांना माझे विचार पटत नाहीत, त्यांनी माझा फोटो वापरायचा नाही, असे त्यांनी थेट सांगितले.
"ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला. ज्यांच्याशी माझे आता वैचारिक मतभेद आहेत त्यांनी माझा फोटो वापरु नये. जिवंतपणी फोटो कोणी. वापरावा हा माझा अधिकार आहे. मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. त्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष विश पाटील आहेत. त्यांनी माझा फोटो वापरावा. अन्य कुणीही माझा फोटो वापरू नये," असे अतिशय रोखठोक मत शरद पवार यांनी मांडले. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांनी काही पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्याच वेळी अजित पवार यांच्या गटाने मुंबईत एका नव्या राष्ट्रवादी कार्यालयाचे उद्घाटन केले. त्या कार्यालयात शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला होता. याकडे साऱ्यांचेच लक्ष वेधले गेले होते. त्याच वेळी शरद पवार यांनी फोटोबाबत ही गोष्ट स्पष्ट केल्याने काका-पुतण्यांमधील संघर्ष तीव्र झाल्याची चर्चा आहे.