MNS Sandeep Deshpande: '...हे तर विक्टीम कार्ड'; व्यंगचित्राच्या माध्यमातून मनसेचा शिवसेना अन् राष्ट्रवादीवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 08:00 AM2022-06-29T08:00:12+5:302022-06-29T08:01:32+5:30
राज्यात ऐतिहासिक सत्ता संघर्ष सुरू असताना मनसेनं सध्याच्या राजकीय परिस्थितीवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडलेली नाही.
मुंबई-
राज्यात ऐतिहासिक सत्ता संघर्ष सुरू असताना मनसेनं सध्याच्या राजकीय परिस्थितीवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडलेली नाही. एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदार गुवाहटीला जाऊन बसले आहेत. त्यांनी परत पक्षात यावं आणि समोरासमोर बसून चर्चा करावी असं आवाहन करणारं पत्रक काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढलं. यात उद्धव ठाकरे यांनी आपला कुटुंबप्रमुख म्हणून मला तुमची काळजी वाटते असं भावनिक आवाहन शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना केलं. याच मुद्द्यावरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज्यातील राजकीय घडामोडींचे LIVE UPDATES येथे क्लिक करा
संदीप देशपांडे यांनी ट्विटर हँडलवर एक व्यंगचित्रट ट्विट केलं असून यात उद्धव ठाकरेंच्या हातात बंडखोरांसाठी परत येण्यासाठीचं विनंती पत्र दिसत आहे. तर त्याचवेळी पाठीमागे उद्धव यांच्या हातात सुरा दाखवण्यात आला आहे आणि हा सुरा अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारच उद्धव यांच्या हातात सोपवत आहेत असं चित्रित करण्यात आलं आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदारांचं पाठबळ असल्याचं चित्रात दाखवण्यात आलं आहे. या व्यंगचित्रासाठी संदीप देशापंडे यांनी काळजी आणि victimcard असे हॅशटॅग वापरले आहेत.
#काळजी#victimcard pic.twitter.com/zruTRZC0lt
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 29, 2022
मुख्यमंत्र्यांचं भावनिक आवाहन
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुवाहाटी येथील शिवसेना आमदारांना परत फिरण्याचं आवाहन केलं. मला काळजी वाटते, अजूनही वेळ गेली नाही, समोर येऊन बोला, आपण मार्ग काढू, अशा शब्दात ठाकरेंनी आमदारांना आश्वस्त केलं. आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे, आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत, आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो, कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही, असं उद्धव ठाकरे यांनी लिहिलं आहे.
शिंदेंनी दिलं प्रत्युत्तर
“एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे, त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआ सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची,याचा अर्थ काय?” असा सवाल एकनाथ शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. तसेच यावेळी #donttrickmaharashtra असा नवा हॅशटॅगही वापरला.