मुंबई-
आम्ही अजूनही गुवाहाटीत असलेल्या आमदारांपैकी काहींना बंडखोर मानायला तयार नाही. २० हून अधिक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते आज सकाळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. याआधी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनीही गुवाहटीमध्ये असलेल्या आमदारांपैकी २१ आमदार आमच्या संपर्कात असून त्यांना परतण्याची इच्छा आहे, असं विधान केलं होतं. त्यामुळे शिंदे गटात खळबळ उडाली आहे. त्यात आज संजय राऊत यांनीही यास दुजोरा दिला आहे.
"कोर्टानं गुवाहटीमधील आमदारांना ११ जुलैपर्यंत पर्यटनाची संधी दिली आहे. तोवर त्यांना झाडी, डोंगर, नदी पाहू द्यात. पण जेव्हा ते मुंबईत येतील तेव्हा अर्ध्याहून अधिक आमदार शिवसेनेसोबत येतील असा विश्वास आजही आम्हाला आहे. गुवाहाटीमध्ये असलेल्या २० हून अधिक आमदार आजही आमच्या संपर्कात आहेत. त्यांचे कुटुंबीयही संपर्कात आहेत", असं संजय राऊत म्हणाले.
"जहालत एक किस्म की मौत है...", संजय राऊतांचा बंडखोर आमदारांवर हल्लाबोल सुरूच
"गुवाहाटीमधील आमदारांपैकी काहींना आम्ही अजूनही बंडखोर मानायला तयार नाही. ते आमच्या संपर्कात आहेत. जोवर ते इथं येत नाहीत तोवर परिस्थिती कळणार नाही. ते परतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याच पाठिशी उभे राहतील", असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
ईडीच्या चौकशीला जाणार नाहीईडीकडून संजय राऊत यांना आज सकाळी ११ वाजता चौकशी उपस्थित राहण्याबाबतचे समन्स जारी करण्यात आले आहेत. याबाबत विचारणा करण्यात आली असता संजय राऊत यांनी सध्या पक्षाचे कार्यक्रम माझ्यासाठी महत्वाचे आहेत. त्यातून जेव्हा मी मोकळा होईन तेव्हा मी चौकशीला सामोरा जाईन. तोवर जाणार नाही, असं ते म्हणाले.
२० बंडखोर आमदार आमच्या संपर्कात, अनिल देसाईंचा दावा, शिंदे गटात खळबळ
फडणवीसांनी डबक्यात पडू नये"देवेंद्र फडणवीस उत्तम विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्याकडे ११६ आमदारांचं बळ आहे. राज्यात इतका मोठा विरोधी पक्ष याआधी कधी मिळालेला नाही. त्यामुळे विधायक कामं ते चांगल्या पद्धतीनं करू शकतात. फडणवीसांकडे ती नक्कीच क्षमता आहे. त्यांना माझा आजही सल्ला आहे की या डबक्यात त्यांनी पडू नये. नाहीतर प्रतिष्ठा धुळीस मिळेल", असं संजय राऊत म्हणाले.