राष्ट्रवादीत उभी फूट पडून राष्ट्रवादीतील ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेतील नाराजी वाढताना दिसत आहे. सीएम शिंदे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमापाला गैरहजर असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीबाबत ते बुधवारी आपल्या आमदारांसोबत महत्त्वाची बैठक घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रिपद मिळाल्यानंतर शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा होती.
राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर द्रौपदी मुर्मू पहिल्यांदाच तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर मंगळवारी संध्याकाळी नागपुरात पोहोचल्या. मुख्यमंत्री शिंदे, राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचे स्वागत केले. यादरम्यान मुर्मू गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठातील दीक्षांत समारंभासह इतर अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.
राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री शिंदे मंगळवारी नागपुरात पोहोचले होते, मात्र काही वेळातच ते मुंबईत परतले. राष्ट्रपतीही मुंबईला पोहोचणार असून विमानतळावर त्यांचे स्वागत केल्यानंतर शिंदे त्यांच्यासोबत सिद्धिविनायक मंदिरात जाणार आहेत, असं सांगण्यात येत आहे. बुधवारी मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे नाराज झालेल्या शिवसेना नेत्यांची भेट घेऊ शकतात. अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर ८ आमदारांना मंत्रीपदे देण्यात आली.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शपथ घेतल्यानंतर शिंदे गटातील नेते नाराज असल्याचे बोलले जात आहे. गेल्या वर्षी शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शिंदे समर्थक आमदारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर आरोप केला होता. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमुळे त्यांच्या भागात अडचणी येत असल्याचे ते म्हणाले होते, दरम्यान आता तेच नेते सत्तेत आल्यानंतर पुन्हा या आमदारांच्या नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.