मुंबई - वरिष्ठ पातळीवर ठरल्याप्रमाणे पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाची घोषणा केली. त्यानंतर ते ‘सागर’ बंगल्यावर आले. नेते आणि आमदारांशी चर्चा करतानाच त्यांना दिल्लीहून फोन आला. ‘तुम्हाला उपमुख्यमंत्रिपद घ्यावे लागेल’ असे तिकडून सांगण्यात येताच फडणवीस यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते पाहून तेथे उपस्थित सर्वच भावुक झाले. शपथविधी समारंभानंतर प्रतिक्रिया देतानाही खासदार धनंजय महाडिक यांचा गळा दाटून आला होता.
फडणवीस यांनी शिंदे यांचे नाव जाहीर केल्यानंतर भाजपच्या नेत्यांना मोठा धक्का बसला. या धक्क्याच्या वातावरणातच सर्वजण ‘सागर’ बंगल्यावर आले. या ठिकाणी नेते, आमदार, खासदार अस्वस्थ होते. त्यांना फडणवीस समजावू लागले. असे कशासाठी केले हे सांगत असतानाच त्यांना दिल्लीहून राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा फोन आला. तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा, असा तो निरोप होता. फडणवीस यांनी त्याला नकार दिला. पुन्हा फोन आला तेव्हा फडणवीस आतल्या खोलीत गेले. बाहेर आले. तेव्हा त्यांचा चेहरा पडला होता. ‘मला पक्षाने आत्ताच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला सांगितले आहे. तेव्हा मी शपथ घेतोय’ असे त्यांनी उपस्थितांना सांगितले.
यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. गेले अडीच वर्षे सातत्याने संघर्ष करणाऱ्या या कणखर नेत्याच्या डोळ्यात अश्रू पाहून उपस्थितांचाही गळा दाटून आला. तेथून पुन्हा सर्वजण राजभवनवर आले. शपथविधी झाला.
खा. महाडिक यांचाही कंठ दाटून आलामाध्यमांनी खासदार धनंजय महाडिक यांना गाठले. त्यांची प्रतिक्रिया विचारली. परंतु फडणवीस यांचा त्याग आणि दुसरीकडे पक्षाचा आदेश मानण्यासाठी स्वीकारलेले उपमुख्यमंत्रिपद याबद्दल सांगताना महाडिक यांचाही आवाज कातर बनला. कंठ दाटून आला. एक वेगळेच भावूक वातावरण गुरुवारी ‘राजभवन’ आणि ‘सागर’ बंगल्याने अनुभवले.