शिंदे सरकारने विश्वास जिंकला अन् मनेही; राजकीय कटुता विरून गेली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 06:42 AM2022-07-05T06:42:27+5:302022-07-05T06:42:55+5:30
विधानसभेच्या विशेष अधिवेशनात रविवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे ॲड. राहुल नार्वेकर यांना १६४ मते मिळाली होती, महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना १०७ मते मिळाली होती. तेवढेच संख्याबळ कायम ठेवत शिंदे सरकारने सोमवारी विश्वास दर्शक ठराव जिंकला.
मुंबई : प्रचंड राजकीय घडामोडीनंतर राज्यात सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे-भाजप सरकारने सोमवारी विधानसभेत १६४ आमदारांच्या भक्कम पाठिंब्यावर विश्वासदर्शक ठराव जिंकला. अडीच वर्षांपूर्वी १७० आमदारांच्या भक्कम पाठिंब्यावर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीला आज ९९ मतांवरच समाधान मानावे लागले. मविआच्या पारड्यात अध्यक्षपदाच्या निवडणुकीपेक्षाही ८ मते कमी पडली.
अभिनंदन ठरावावर बोलताना एक-दोन अपवाद वगळता, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह सर्वच सदस्यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हलकीफुलकी भाषणे केल्यामुळे गेले काही दिवस निर्माण झालेली राजकीय कटुता विरून गेली. त्यामुळे नवनिर्वाचित सरकारने साऱ्यांची मने जिंकल्याची भावना व्यक्त करण्यात येत होती. ठराव सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी त्यास अनुमोदन दिले. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठरावाच्या बाजूने कोण आणि विरोधात कोण, याची शिरगणतीचे आदेश दिले. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात रविवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे ॲड. राहुल नार्वेकर यांना १६४ मते मिळाली होती, महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना १०७ मते मिळाली होती. तेवढेच संख्याबळ कायम ठेवत शिंदे सरकारने सोमवारी विश्वास दर्शक ठराव जिंकला.
संतोष बांगरही शिंदे गटात
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला. या गटाचे आमदार संतोष बांगर (कळमनुरी, जि. हिंगोली) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे आता शिंदे गटात शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले ४० आमदार झाले आहेत. बांगर यांनी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान केले.
अजित पवार विरोधी पक्षनेते
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी निवड केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भातील घोषणा केली. विरोधी पक्षनेता हा जनतेची बाजू सरकारसमोर मांडणारा असतो. सरकार रुपी हत्तीवर नियंत्रण ठेवणारा महुतासारखा तो काम करतो. अजित पवार यांच्यासारखा विरोधी पक्षनेत्यासोबत काम करुन राज्याचा विकास करायचा आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तर, अजित पवार यांना सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला आहे. आम्ही ७२ तासांच्या मंत्रीमंडळाचे सहकारीही होतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला.
शहीद होईन, माघार नाही
मी मुख्यमंत्री झालो आहे याचा विश्वास मला अजूनही वाटत नाही. शिवसेनेत माझे खच्चीकरण करण्यात आले. सुनील प्रभूंना ते माहिती आहे. मी सच्चा शिवसैनिक आहे, शिवसेना वाचविण्यासाठी लढून शहीद झालो तरी चालेल पण आता माघार नाही. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
माफ केले, हाच बदला
अडीच वर्षांपूर्वी मी पुन्हा येईन, असे म्हणालो तेव्हा अनेकांनी माझी टिंगलटवाळी केली, बरेच काही ते बोलले. मी त्यांचा बदला घेणार आहे...त्यांना मी माफ केले हाच माझा बदला. सार्वजनिक जीवनात कोणाची टिंगल लक्षात ठेवायची नसते. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
निधीवाटपात भेदभाव नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मी भेदभाव करत असल्याचा आरोप अनेकांनी केला. पण, अर्थमंत्री म्हणून मी कधीच भेदभाव केला नाही. आमदारांचा निधी एक कोटीवरून पाच कोटी केला. डोंगरी विकासाचा निधी वाढविला. मी भेदभाव करणारा माणूस नाही.- अजित पवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा