पहिला डाव एकनाथ शिंदेंचा, आज खेळ विश्वासाचा; विधानसभा पुन्हा गाजणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 06:57 AM2022-07-04T06:57:53+5:302022-07-04T06:58:58+5:30
शिंदे गटाला मान्यता; विधानसभा अध्यक्षपदाच्या मतदानावेळी सभागृहात रंगले व्हिप युद्ध
मुंबई : विधानसभेचे अध्यक्षपद जिंकत एकनाथ शिंदे-भाजप सरकारने विधानसभेच्या विशेष अधिवेशनात पहिला डाव जिंकला. आता शिंदे सरकार सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडणार असून त्या निमित्ताने सत्तापक्ष व विरोधक यांच्यातील दुसरा सामना बघायला मिळेल. या निवडणुकीत भाजपचे दोन आमदार अनुपस्थित असताना १६४ मते घेवून भाजपचे राहुल नार्वेकर जिंकले. या सरकारला १६६ आमदारांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले. आता नवे सरकार विश्वासमतही जिंकेल अशी स्थिती आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेतील व्हिपयुद्ध समोर आले. सरकारवरील विश्वासदर्शक ठराव आम्ही भक्कम बहुमताने जिंकू असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विशेष अधिवेशनात पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट आमनेसामने येऊन तणाव निर्माण होईल, असे म्हटले जात होते परंतु दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी संघर्ष टाळला. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक शांततेच्या वातावरणात पार पडली.
जे अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने घडले त्याचीच पुनरावृत्ती सोमवारी सभागृहात होण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून मतदान मागितले जाईल. मतदान खुल्या पद्धतीने होणार आहे. प्रस्तावाच्या बाजूने कोण आणि विरोधात कोण याची शिरगणती करून निकाल दिला जाणार आहे. कोणी व्हिप झुगारला म्हणून शिरगणती थांबविली जात नाही. विश्वासदर्शक ठरावाच्या विरुद्ध अध्यक्षांकडे वा न्यायालयात नंतर दाद मागण्याचा मार्ग मात्र मोकळा असेल.
ठाकरे गटाला धक्का
विधानसभेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या गटाला विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील गटाला मोठा धक्का बसला आहे. शिंदे सरकार सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडणार असतानाच नार्वेकर यांनी हा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांची ऑक्टोबर २०१९ मध्ये शिवसेनेच्या गटनेतेपदी करण्यात आलेली निवड नार्वेकर यांनी वैध ठरविली आहे. तसेच शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्तीही वैध ठरविण्यात आली आहे. ठाकरे गटाचे गटनेते अजय चौधरी यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.
रविवारी शिंदे-भाजप युती सरकारने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. आता शिंदे गटाला अध्यक्षांनी मान्यता दिल्यामुळे उद्या होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी शिंदे गटाचे प्रतोद गोगावले यांनी काढलेला व्हिप मान्य करून विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान ठाकरे गटाला करावे लागणार आहे.
सेनेचे विधानभवनातील कार्यालय केले सील
शिवसेनेच्या दोन गटांमध्ये संघर्ष सुरू असल्याने विधानभवनातील पक्षाचे कार्यालय विधानमंडळ सचिवालयाने सील केले आहे. त्यामुळे विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेच्या दोन्ही गटांतील आमदारांसाठी कार्यालयच नसल्याचे चित्र होते.
व्हिप कोणत्या गटाचा?
शिवसेनेच्या शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी राहुल नार्वेकर यांना मतदान करण्याचा व्हिप काढला. उद्धव ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी राजन साळवी यांना मतदान करा, असा व्हिप शिवसेना आमदारांसाठी काढला. शिंदे गटाने ठाकरे गटाचा तर ठाकरे गटाने शिंदे गटाचा व्हिप झुगारून विरोधात मतदान केले.
दोन्ही गटांच्या याचिका
ठाकरे गटातर्फे खा. अरविंद सावंत यांनी अध्यक्ष नार्वेकर यांची भेट घेत याचिका सादर केली. व्हिप मोडणाऱ्या शिंदे गटाच्या ३९ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली. शिंदे गटातर्फेही व्हीपचे पालन न केल्याबाबत अशीच याचिका आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य आमदारांवर करण्यात आली. शिंदे गटातर्फे दीपक केसरकर यांनी सभागृहात सांगितले की आमचाच व्हिप कायदेशीर आहे, आमच्याकडे ३९ आमदारांचे बहुमत आहे. तसे पत्र आम्ही अध्यक्षांकडे दिले आहे. सभागृहातील कामकाजात ठाकरे गट बॅकफूटवर असल्याचे आणि राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याचे धोरण असल्याचे जाणवले.
झिरवाळ अन् नार्वेकरांकडून व्हिप झुगारल्याची नोंद
शिंदे गटाने व्हिप झुगारल्याची नोंद उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी घेतली. मतदानाचे रेकॉर्डिंगही केलेले आहे, असे ते म्हणाले. नार्वेकर यांनी सांगितले की ३९ आमदारांच्या गटाने जारी केलेल्या व्हिपची नोंद मी घेतलेली आहे.