Maharashtra Political Crisis: "आम्हीच एकनाथ शिंदेंना इकडं घेऊन आलोय", सांगोल्याच्या व्हायरल आमदारांचा नवा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 05:22 PM2022-06-28T17:22:30+5:302022-06-28T17:23:59+5:30

शहाजीबापूंच्या पोटातला संवाद ओठावर अन् ओठातला सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

Maharashtra Political Crisis: "We have brought Eknath Shinde here", video of viral MLAs of Sangola Shahaji patil | Maharashtra Political Crisis: "आम्हीच एकनाथ शिंदेंना इकडं घेऊन आलोय", सांगोल्याच्या व्हायरल आमदारांचा नवा व्हिडिओ

Maharashtra Political Crisis: "आम्हीच एकनाथ शिंदेंना इकडं घेऊन आलोय", सांगोल्याच्या व्हायरल आमदारांचा नवा व्हिडिओ

Next

मुंबई - नेत्यांचा कार्यकर्त्यांशी संवाद होतच असतात. मात्र, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अस्थिर बनलेली असताना सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी एका कार्यकर्त्याशी साधलेला अस्सल सोलापुरी ग्रामीण ढंगातील ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील.. ओके !’ हा संवाद तुफान व्हायरल झाला. विशेष म्हणजे गाण्याच्या रूपातूनही हा संवाद पुढे आला. टी-शर्टांवरही झळकला. आता, या आमदारांनी व्हिडिओ शेअर करत आम्ही इकडं स्वखुशीने आलोय, कुणीही आम्हाला जबरदस्तीने आणलं नसल्याचं त्यांनी म्हटलंय.  

शहाजीबापूंच्या पोटातला संवाद ओठावर अन् ओठातला सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. देश-जगभरातून लाखो लाईक्स, त संवादाच्या गाण्याला मिळत आहेत. विशेष म्हणजे हॉटेलमधील आमदारांनाही या संवादाची, माणदेशी भाषेची भुरळ पडल्याचं दिसून आलं. म्हणूनच, एकनाथ शिंदेंनीही आमदार पाटील यांना पुन्हा एकदा हा डायलॉग म्हणून दाखवायची विनंती केली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. दरम्यान, शहाजी पाटील यांनी एक व्हिडिओ शेअर करत आपणच एकनाथ शिंदेंना इकडं घेऊन आल्याचं त्यांनी म्हटलंय. मी सध्या एकनाथ शिंदे यांच्या सहवासात गुवाहाटीत आहे. ही आमची राजकीय चळवळ आहे, राजकीय लढाई असून आम्हाला कोण घेऊन आलं नाय, आम्हाला कोण मारलं नाय. कृपया कोणीही अफवा पसरवू नये, असे म्हणत सांगोल्यातील आमदार शहाजी पाटील यांनी व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधला आहे.

आम्ही 40 आमदारांनी एकजुटीनं निर्णय घेतला, आम्हीच एकनाथ शिंदेंना घेऊन गुवाहाटीला आलोय. आम्हीच त्यांना विनंती करुन आमचं राजकारण वाचावायची, आमच्या मतदारसंघातील जनतेचं भविष्य वाचवा. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आमचं राजकारण नष्ट होतंय. आम्ही जनतेसमोर जात असताना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं, तेव्हाच आम्हाला भरपूर मतं मिळाली. मी गणपतराव देशमुख यांच्यासारख्या बलाढ्या नेत्याच्या मतदारसंघात शिवसेनेचा झेंडा रोवला. मात्र, गेल्या अडीच वर्षात आमची कुचंबना झाल्याचं शहाजी पाटील यांनी व्हिडिओतून म्हटले आहे. 

शहाजी पाटील प्रकाशझोतात

शिवसेनेत बंड केल्यावर एकनाथ शिंदे जेवढे प्रकाशझोतात आले, त्यापेक्षा अधिक शहाजीबापू आले ते त्यांच्या अस्सल सोलापुरी ग्रामीण ढंगातील संवादामुळे. बंडानंतर शिंदे यांच्या गटात गेेलेल्या काही मंत्री, आमदारांसह शहाजीबापू सध्या गुवाहाटीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये असताना त्यांनी कार्यकर्त्याशी साधलेल्या संवादानंतर ‘बापू’ राज्यात चांगलेच ट्रेंडमध्ये आले आहेत. बापूंच्या या संवादातून रचलेल्या या गाण्यानं सोशल मीडियाने दुष्काळग्रस्त सांगोल्याला देश-विदेशात पोहोचवलं आहे.

एकनाथ शिंदेनाही शहाजी पाटलांच्या संवादाची भुरळ

आमदार शहाजीबापू पाटील यांच्या या वाक्याची भुरळ संपूर्ण महाराष्ट्राला पडलेली आहे. अशात महराष्ट्रापासून दूर असले तरीही मनाने महाराष्ट्रात असलेल्या एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्यासोबतच्या सर्व आमदार महोदयांना या वाक्याची भुरळ पडली नसती तरच नवलच. आज सकाळी सगळे आमदार हॉटेलच्या लॉबीत आले असता त्यांनी शहाजी बापूंचं मनापासून कौतुक केलं. तसेच, एकनाथ शिंदेंनी शहाजी पाटील यांना हे त्यांचं सुपरहिट वाक्य पून्हा एकदा म्हणून दाखवण्याची विनंती केली, तसेच हे वाक्य किती व्हायरल झालय आणि त्याची लोकांनी गाणी तयार केलीत हेदेखील दाखवून दिलं. यावेळी नक्की काय गम्मत घडली ती आता कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या हाही व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
 

Web Title: Maharashtra Political Crisis: "We have brought Eknath Shinde here", video of viral MLAs of Sangola Shahaji patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.