Chitra Wagh : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जातायत. अशातच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या प्रचारासाठी पॉर्न स्टारला घेऊन जाहिरात बनविल्याचा आरोप भाजप प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केला. उद्धव ठाकरेंनी याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही चित्रा वाघ यांनी केली.उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रात पॉर्न, पब आणि पार्टीची संस्कृती आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही वाघ यांनी केला. मात्र आता ज्या कलाकाराला वाघ यांनी पॉर्न स्टार म्हटलं आहे त्याने समोर येत आपली बाजू मांडली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या ज्या जाहिराती येत आहेत, त्यात जे पात्र आहे ते अॅडल्ट स्टार आहे. जाहिरातीत जे पात्र आहे ते अॅडल्ट स्टार आहे. हा अॅडल्ट स्टारच महिलांवरील अत्याचार कधी थांबणार अशी विचारणा जाहिरातीत करताना दिसत आहे, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली होती. त्यावर आता या जाहिरातीमधील कलाकाराने पुढे येत चित्रा वाघ यांना माफी मागण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 'वॉर रुकवा दी पापा' ठाकरे गटाच्या जाहिरातीत अभिनेते प्याराली नयानी यांनी काम केलं आहे. त्यामुळे माफी न मागितल्यास चित्रा वाघ यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशाराही नयानी यांनी दिलाय.
"भाजपच्या नेत्या चित्रा वाघ या एक सुशिक्षित महिला आहेत. कलावंत जेव्हा एखाद्या सिनेमात किंवा मालिकेत काम करतो तेव्हा त्या भूमिकेची जशी मागणी असते त्याप्रमाणे अभिनय करावा लागतो हे त्यांना माहीत असावे . आज त्यांनी माझ्या एका वेबसिरीज च्या भूमिकेतील फोटो दाखवून मी पॉर्न स्टार असल्याचा दावा केला. त्यांच्या या दाव्याची मी निंदा करतो आणि माझ्या अभिनयाला पॉर्न स्टारची उपमा देऊन माझी अब्रूनुकसानी केल्याचा आक्षेप त्यांच्यावर घेतो. त्यांनी दोन दिवसात माझी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर मी अब्रूनुकसान केल्याचा दावा कोर्टात दाखल करेन," असा इशारा प्याराली नयानी यांनी दिला आहे.
"शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या जाहिरातीत मी काम केले आहे, त्यामुळे त्या जाहिराती करणारा कलावंत पॉर्न स्टार असल्याचा शोध त्यांनी लावला. जे फोटो त्यांनी प्रेस कॉन्फरेन्समध्ये दाखवले ते माझ्या एका वेब सिरीजमधले आहेत आणि ते त्या भूमिकेचा एक भाग होता. चित्राताई, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी कुटुंब व्यथित झालं आहे. गेल्या आठ वर्षात मी माझ्या कुटुंबातील तीन सदस्यांना गमावलंय. त्यापैकी दोघांना तर करोना काळात गमावलं आहे. आता आम्ही तिघंच आहोत. मी एक पिता असून माझ्या दोन लेकरांचं पालनपोषण करतोय. केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांनी माझी प्रतिमा मलीन केली आहे," असेही नयानी यांनी म्हटलं आहे.