Aditya Thackeray On Marathi vs Gujarati : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठी गुजराती वादाचं प्रकरण चांगलेच तापलं आहे. दोन दिवसांपूर्वी गिरगावात मराठी मुलांनी मुलाखतीसाठी येऊ असे सांगणारी जाहीरात एका तरुणीने दिली होती. मात्र प्रकरण वाढल्यानंतर तरुणीने माफी मागितली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ईशान्य मुंबईचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या कार्यकर्त्यांना घाटकोपरच्या गुजरातीबहुल सोसायटीमधील काही गुजराती रहिवाशांनी रोखलं होतं. त्यावरुन भाजप सत्तेवर आल्यास महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यांना हीच वागणूक मिळेल, अशी संतप्त प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली होती. आता भाजमुळे मस्ती वाढली ही मस्ती वाढल्याचे विधान आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
ऐन निवडणुकीत मुंबईत मराठी गुजराती असा वाद पेटला आहे. गुजरातच्या एका एचआरने गिरगावातील एका कार्यालयात ग्राफिक्स डिझायनरसाठी जागा असल्याची माहिती दिली होती. मात्र इथे मराठी उमेदवारांनी येऊ नये असे या जाहिरातीमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर मोठा वाद उफाळून आला. अनेक मराठी सेलिब्रिटींनी देखील याविषयी रोष व्यक्त केला होता. त्यानंतर घाटकोपरमधील एका गुजरातीबहुल सोसायटीत संजय दिना पाटील यांची प्रचारपत्रकं वाटण्यास कार्यकर्त्यांना विरोध करण्यात आला होता. मराठी माणसाला या इमारतीत प्रचार करून देणार नाही, असं कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं.याच मुद्द्यावरुन आता आदित्य ठाकरे यांनी भाजपला घेरलं आहे. मराठी गुजराती वादाबाबत बोलताना झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीमध्ये आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
"आज आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र आलेलो आहोत. कुठल्याही विचाचधारेचा पक्ष असला तर देशाचा, संविधानाचाच विचार करणार. भाजपला मुंबई तोडायची आहे, लोकशाही संपवायची आहे. भाजपला मुंबई तोडायची आहे, लोकशाही संपवायची आहे. ईशान्य मुंबईमध्ये मराठी प्रचार करणाऱ्यांना इमारतीमध्ये येऊ दिले नाही. ही मस्ती भाजपमुळे वाढली आहे. असं वातावरण मुंबईत कधीच नव्हतं. मुंबईविरोधी कारवाई जेव्हा भाजप करतं तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत राहू शकत नाही. पीयूष गोयल यांनी मंत्री असताना १० वर्षांत मुंबईसाठी काही आवाज उठवला का?," असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.
गुजरातला उद्योग चाललेत त्याला पाठिंबा आहे का? - आदित्य ठाकरे
"मी मनसेच्या नेत्यांवर कधी बोलत नाही. ते पथ्य मी पाळतो. पण मी मनसेच्या कार्यकर्त्यांना विचारतो, तुम्ही जो भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिलाय आणि त्यांच्या शिंदे गटाला दिलाय, त्याच्यात गुजराती सोसायटीबाबत जी घटना घडली, गुजरात आणि गुजराती लोकांसोबत आमचे भांडण नाही. पण इथून उद्योग उचलून तिकडे नेले जातात तेव्हा मी नडणार नाहीतर ते सर्व आमचेच आहेत. मराठी माणसाला नोकरी नाकारली, सगळे उद्योग धंदे जे गुजरातला चाललेत त्याला बिनशर्त पाठिंबा आहे का?," असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.