मुंबई - एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी महाआघाडीत येण्याची इच्छा व्यक्त केल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एमआयएमशी युती शक्य नसल्याचे सांगत या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतरही आता भाजपाने पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला डिवचले आहे. एमआयएमशी युती नाही तो भाजपाचा डाव आहे, असे मुख्यमंत्री सांगत असले तरी सत्तेसाठी काहीही हेच शिवसेनेचे धोरण, असा टोला भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.
केशव उपाध्ये यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले की, एमआयएमशी युती नाही तो भाजपाचा डाव आहे, असे मुख्यमंत्री सांगत असले तरी सत्तेसाठी काहीही हेच शिवसेनेचं धोरण आहे. कारण अंबादास दानवे कसे निवडून आले, ते पाहा. ऑगस्ट २०१९ च्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एमआयएमच्या २६ पैकी २४ जणांनी कुणाला मतदान केले? त्यावेळी या नगरसेवकांना एमआयएमने नोटिस दिली होती, असे केशव उपाध्ये म्हणाले.
दरम्यान, एमआयएमने महाविकास आघाडीत येण्यासाठी दिलेल्या ऑफरवर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, भाजपने एमआयएमला शिवसेनेला बदनामी करण्याची सुपारी दिली आहे. काही झाले तरी एमआयएमसोबत युती होणार नाही. शिवसेना कधीही हिंदुत्व सोडणार नाही. हा भाजपाच्या व्यापक कटाचा भाग असल्याचा दावा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या संबोधनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.