मुंबई- काल संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाली. या सभेत महाविकास आघाडीतील नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण,विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणं केली. या सर्व नेत्यांनी मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्र्यांवरही आरोप केले. या सभेवरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेनेतील आमदार संजय शिरसाट यांनीही प्रत्यारोप केला आणि माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्या संदर्भात मोठा गौप्यस्फोट केला. (Maharashtra Politics)
आमदार संजय शिरसाट म्हणाले,'काँग्रेसमध्ये एकवाक्यता नाही, अशोक चव्हाण आणि बाकीच्या नेत्यांचं पटत नाही, त्यांना काँग्रेसमध्ये चांगली वागणूक मिळत नाही. यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील, असा गौप्यस्फोटही आमदार संजय शिरसाट यांनी केला.
काल महाविकास आघाडीच्या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित नव्हते. यावरुनही राजकीय चर्चा सुरू आहेत. यावरुनही आमदार शिरसाट यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. काल झालेली सभा वज्रमुठ सभा नव्हती. नाना पटोले काल आजारी होते म्हणून आले नाहीत सांगत आहेत मग आज ते कोर्टात चालले आहे, यावरुनच महाविकास आघाडीत काय सुरू आहे ते दिसत आहे, असंही संजय शिरसाट म्हणाले.
उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका
मविआच्या नेत्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टीकेचे लक्ष्य बनविले. सर्वांत आक्रमक भाषण उद्धव ठाकरे यांनी केले. ते म्हणाले, सध्या कोंबड्या झुंजविण्याचे उद्योग सुरू आहेत. निवडणुका आल्याने जातीय तेढ निर्माण केली जात आहे. हिंदू जनआक्रोश मोर्चे काढले जाताहेत, सावरकरांच्या नावे यात्रा काढली जातेय. सावरकरांबद्दल आम्हाला आदर आहेच; पण तुम्हाला खरेच प्रेम असेल तर सावरकरांना भारतरत्न देण्याची हिंमत दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.