Maharashtra Politics : मुंबई- गेल्या दोन दिवसापासून राष्ट्रवादीतून अजित पवार काही आमदारांना घेऊन बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आज अजित पवार यांनी मुंबईत काही आमदारांची बैठक बोलावल्याची चर्चा सुरू होती. या चर्चांवर आता राष्ट्रवादीच्या नेत्या विद्याताई चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“अजित पवार गट घेऊन आले तर स्वागत करु, NCPसह आल्यास शिवसेना सत्तेत राहणार नाही”
राष्ट्रवादीच्या नेत्या विद्याताई चव्हाण म्हणाल्या, महाविकास आघाडीला चांगला सपोर्ट मिळत आहे. या सभा घेण्याची जबाबदारी अजित पवार यांच्यावर आहे. आता राज्यातील सरकार संकटात आहे. यामुळे अजित पवार यांच्या संदर्भात अशा अफवा पसरवण्याचे काम सुरू आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांचे करिअर संपवण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही विद्याताई चव्हाण यांनी केला.
'भाजपचा अशा अफवा पसरवत आहे, त्यांना आता राज्यात कोणही साथीदार नाही त्यामुळे भाजप असं करत आहे, असंही चव्हाण म्हणाल्या. अजितदादा राज्यातील एक मोठे नेते आहेत. २०२४ च्या निवडणुकीत भाजपसोबत कोणही नाहीत, त्यामुळे ते आता साथीदाराच्या शोधात आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या संदर्भात अशा अफवा उठवण्याचे काम सुरू आहे, असंही विद्याताई चव्हाण म्हणाल्या.
महाविकास आघाडीमध्ये भाजप मिठाचा खडा टाकण्याच काम करत आहेत. अजितदादा अस काही करणार नाहीत, असंही विद्याताई चव्हाण म्हणाल्या.
“अजित पवार गट घेऊन आले तर स्वागत करु"
पार्थ पवार यांचा पराभव झाल्यापासून अजित पवार नाराज आहेत. महाविकास आघाडीची सत्ता असताना काही कामांसाठी उद्धव ठाकरे यांची भेट अजित पवार यांनी अनेकदा मागितली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी भेट दिली नाही. आजही महाविकास आघाडीच्या सभांमध्ये अजित पवार यांचे स्थान शोधावे लागते. अजित पवार स्वतःचा गट घेऊन आमच्यासोबत सत्तेत आले तर त्यांचे स्वागतच करू. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून पाठिंबा देत असतील तर शिवसेना सत्तेत राहणार नाही, अशी स्पष्ट प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली.
माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, आम्ही महाविकास आघाडीचाच भाग होतो. मात्र, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाणे आम्हाला मान्य नव्हते. म्हणून आम्ही बाहेर पडलो होतो. मात्र, अजित पवारांच्या नाराजीवर चर्चा सुरू आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून अजित पवार काही आमदारांना घेऊन भाजपसोबत जाणार असतील तर आम्ही शिवसेना सत्तेत राहणार नाही. मात्र, स्वतः गट घेऊन अजित पवार भाजप किंवा शिवसेनेत येणार असतील, तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असे संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे सांगितले.