थोडे मतभेद झाले, पण...; शिंदेंच्या दोन जाहिरातींबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 01:50 PM2023-06-14T13:50:51+5:302023-06-14T14:12:39+5:30
शिवेसेनेतील शिंदे गटाच्या वर्तमानपत्रातील आलेल्या जाहिरातीवरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
मुंबई- शिवेसेनेतील शिंदे गटाच्या वर्तमानपत्रातील आलेल्या जाहिरातीवरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. काल आलेल्या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो होता. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो नव्हता. यामुळे भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यामुळे भाजप आणि शिंदे गटात मतभेद असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,कार्यकर्त्यांच्या मनाविरुद्ध होतं तेव्हा कार्यकर्ते विरोधातही प्रतिक्रिया देतं असतात. भाजपमधील काही कार्यकर्त्यांची मनं तुटली आहेत, देवेंद्रजी यांनी पाच वर्ष मुख्यमंत्रीपदी होते यावेळी त्यांनी पक्षवाढीसाठी काम केलं, त्यामुळे कार्यकर्ते चिडले आहेत. काल दिलेली जाहिरात ही कोणी दिली हे अजुनही समोर आलेलं नाही. देवेंद्र फडणवीस यांची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी करणे बरोबर नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अशा प्रतिक्रिया दिल्या. एकनाथ शिंदे इतक्या छोट्या मनाचे नाहीत, त्यामुळे ते असं करणार नाहीत. शिंदे-फडणवीस सरकार चांगले चालले आहे, यात मिठाचा खडा कोण टाकतं आहे हे पाहणार आहे. मी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन चर्चा करणार आहे, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
'आज आलेली जाहिरात ही त्यांचा गट म्हणून छापली आहे. आज त्यांनी चांगल्या भावनेने दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. काल आलेल्या जाहिरातीत कोणीतरी खोडसाळपणा केला होता. आज तो दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला ही आमच्यासाठी आणि युतीसाठी चांगली गोष्ट आहे. आमच्याकडून चूक झाली तर आम्ही दुरुस्त करणार त्यांच्याकडून चूक झाली तर ते दुरुस्त करणार. कोणीतरी छोट व्हावं कुणीतरी मोठं व्हावं. आमच्यात मतभेत असतील पण मनभेद नाहीत, असंही बावनकुळे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचं नेतृत्व करत आहेत. आम्ही त्यांच्या नेतृत्वार विश्वास ठेवला आहे. एकनाथ शिंदे सगळ्याच आमदारांना मदत करत आहेत. केंद्रीय नृत्वानेही त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. आम्हाला त्यांचा पक्ष सांभाळण्याची गरज नाही, शिंदे त्यांचा पक्ष व्यवस्थित सांभाळत आहेत, असंही बावनकुळे म्हणाले.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपसह शिंदे गटावर टीका केली. या टीकेला आज बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले. बावनकुळे म्हणाले, संजय राऊत यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आमचे आमदार नितेश राणे आहेत, त्यामुळे आम्ही त्यावर बोलणार नाही. केंद्र सरकारने केलेल्या कामाच्या पुस्तिका आम्ही केलेल्या आहेत. त्या पुस्तिका आम्ही राज्यात वाटणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात झालेल्या कामाची माहिती आम्ही देणार आहोत. २०२४ नंतर मोदी काय करणार आहेत याची माहिती देणार आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.