CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. तीन दिवसांच्या आत माध्यमांसमोर बिनशर्त माफी मागावी, असे या नोटीशीद्वारे सांगण्यात आले आहे. अन्यथा संजय राऊत आणि दैनिकाला फौजदारी आणि दिवाणी स्वरुपाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असे या नोटीशीमध्ये म्हटलं आहे. दुसरीकडे संजय राऊत यांनी स्वतः ट्वीट करत या नोटीसीची माहिती दिली आहे.
ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातील रोखठोकमधून संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट आरोप केला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. संजय राऊत यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांनी नोटीस पाठवल्याची माहिती एक्स या सोशल मीडिआ अकाऊंटवरुन दिली आहे. "५० खोके एकदम ओके. इसे कहते है ऊलटा चोर कोतवाल को डाटे. असंवैधानिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला एक अतिशय मनोरंजक आणि एक मजेदार राजकीय दस्तऐवज पाठवला आहे. आता मजा येईल!! जय महाराष्ट्र!," असे संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदेशीर नोटीस पाठवल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे. या नोटीशीमध्ये मानहानीचा दावा देखील करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघात २५ ते ३० कोटी रुपये वाटल्याचा आरोप संजय राऊतांनी सामनामधून केला होता. पैसे वाटण्याच्या आरोपावरुन संजय राऊतांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. संजय राऊत हे सध्या मुंबईबाहेर असल्याने यावर आता त्यांच्या जवळच्या व्यक्तीकडून उत्तर दिलं जाईल अशी माहिती समोर आली आहे.
काय म्हटलंय नोटीशीत?
"२६ मे रोजीच्या सदरात एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक मतदारसंघात २५ ते ३० कोटी रुपये वाटल्याचा बिनबुडाचा आणि धांदात खोटा आरोप केल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तसेच अजित पवार यांचे उमेदवार निवडून येऊ नयेत, यासाठीही खटाटोप केल्याचा आरोप सदरात होता. हा आरोपही बदनामीकारक आणि दिशाभूल करणारा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीत एकही पैसा वितरित केलेला नाही. जर पैसे वाटल्याचा आरोप करायचा असेल तर त्यासंबंधीचे पुरावे सादर करा. फक्त मुख्यमंत्र्यांची प्रतिमा डागाळण्यासाठी आणि लोकांचे लक्ष विचलित करून आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी अशाप्रकारचा अपप्रचार केला जात आहे," असा आरोप या नोटिशीतून करण्यात आला आहे.