Join us  

Maharashtra Politics : ईडी चौकशीअगोदर अजित पवारांचा फोन आला होता का? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 11:42 AM

ईडी चौकशीविरोधात राज्यभराती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.

Maharashtra Politics : इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग ॲण्ड फायनॅन्शियल सर्व्हिसेस (आयएल ॲण्ड एफएस) या कंपनीत झालेल्या कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सोमवारी ईडीने (सक्तवसुली संचालनालय) साडेनऊ तास चौकशी केली. रात्री साडेनऊच्या सुमारास ते ईडी कार्यालयाबाहेर आले. दरम्यान, ईडी चौकशीविरोधात राज्यभराती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. दरम्यान राज्यभरातून अनेक नेत्यांचे फोन आल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या फोन संदर्भातही त्यांनी प्रतिक्रिया दिली.  

आमदार जयंत पाटील म्हणाले, मला राज्यातून सर्वच प्रमुख नेत्यांचे फोन आले. आज सकाळीही अनेकांचे फोन आले. यावेळी माध्यमांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा फोन आला होता का? असा प्रश्न केला. यावेळी जयंत पाटील म्हणाले, त्यांचा मला फोन आलेला नाही. दरम्यान, आता राजकीय चर्चांना उधाणं आलं आहे. 

जयंत पाटलांची तब्बल साडेनऊ तास चौकशी; ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी

जयंत पाटलांची ईडी चौकशी

ईडीच्या कार्यालयातून चालतच पाटील राष्ट्रवादीच्या कार्यालयात गेले. सोमवारी सकाळी पावणेबाराच्या दरम्यान ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले. उपलब्ध माहितीनुसार, २००८ ते २०१४ या कालावधीमध्ये आयएल ॲण्ड एफएस समूहातील काही कंपन्यांनी सरकारकडून पायाभूत सुविधांचे काम प्राप्त केले होते आणि ते काम करण्यासाठी उपकंत्राटदार नेमले. 

या उपकंत्राटदारांकडून पाटील यांच्या निकटवर्तीयांना काही पैसे मिळाल्याचा आरोप आहे. यावेळी जयंत पाटील हे राज्य सरकारमध्ये मंत्री होते. पाटील यांना या प्रकरणात काही आर्थिक लाभ झाला का, याचा तपास करण्यासाठी ईडीने पाटील यांची चौकशी केल्याचे समजते. 

शरद पवार काय म्हणाले? 

सत्ताधाऱ्यांची राष्ट्रवादीकडून काही अपेक्षा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. काय असेल ती किंमत देऊ, पण अपेक्षा पूर्ण करणार नाही, हे सूत्र त्यांना पसंत पडत नसल्याने या यातना सहन कराव्या लागत आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. 

टॅग्स :जयंत पाटीलअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस