Join us  

विधानसभेच्या जागावाटपात पितृपक्षामुळे आला अडसर! महायुती, महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा होणार नंतरच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 7:41 AM

पितृपक्ष संपल्यानंतर नवरात्र उत्सवाच्या काळात त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात बैठका सुरू झाल्या असल्या तरी अंतिम फाॅर्म्युला लगेच जाहीर होणार नाही. पितृपक्ष संपल्यानंतर नवरात्र उत्सवाच्या काळात त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

पितृपक्षाला १८ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. २ ऑक्टोबरपर्यंत पितृपक्ष असेल.  पितृपक्षात कोणताही शुभ निर्णय करू नये, अशी धारणा आहे. राजकीय पक्ष अनेकदा त्याचे पालन करतात, असे यापूर्वीही निदर्शनास आलेले होते. आमची एकमेकांशी चर्चा सुरू आहे, ती सुरूच राहील;  पण पुढे पितृपक्ष आहे, त्यानंतरच जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करू, असे दोन्ही बाजूंचे नेते सांगत आहेत. जागावाटपाची चर्चा मात्र पितृपक्षातही सुरू राहील.  नवरात्र उत्सवाला ३ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. त्यानंतर  जागावाटपाचे सूत्र, विविध पक्षांचे उमेदवार जाहीर करणे हे सगळे सुरू होईल.

३० जागांचा पेच

महाविकास आघाडीत १२५ जागांवर तिन्ही पक्षांचे एकमत झाले असल्याचे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आधीच जाहीर केले आहे.

हे विधान लक्षात घेता अजून १६० हून अधिक जागांवर एकमत होणे बाकी असल्याचे स्पष्ट होते.

त्यातील केवळ तीस एक जागा अशा आहेत की ज्यावर तोडगा काढणे कठीण आहे. या जागांवर मविआतील २ किंवा ३ पक्षांचा दावा असल्याने निर्णय घेणे अडचणीचे आहे. 

आचारसंहिता कधीपासून ?

नोव्हेंबरच्या १६ ते १८ तारखेदरम्यान विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान होईल, असे मानले जात आहे.

त्यामुळे तीस दिवस आधी म्हणजे

१६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे.

जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवून उमेदवार जाहीर करण्याची ही प्रक्रिया महायुती आणि महाविकास आघाडी १० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करेल, अशी शक्यता आहे.

महायुतीतील चर्चेत प्रगती

जागावाटपासंदर्भात भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटात आतापर्यंत तीनवेळा चर्चा झाली आहे. तिन्हीवेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या शिवाय शिंदे-अजित पवार यांच्यातही स्वतंत्र चर्चा झाली आहे. फडणवीस-अजित पवार यांच्यातदेखील स्वतंत्रपणे चर्चा झालेली आहे.

भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले, की २८८ पैकी ७५ टक्के जागांवर महायुतीत एकमत झाले आहे. याचा अर्थ जवळपास २१५ जागांवर एकमत झाल्याचे मानले जाते. मात्र, ७०हून अधिक जागा अशा आहेत की, ज्याबाबतचा तिढा अजूनही कायम आहे. खरी कसोटी या जागांच्या वाटपाचीच आहे.

‘सिटिंग गेटिंग’ फॉर्म्युल्यानुसार ज्यांचे जिथे आमदार ती जागा त्यांना, हे लक्षात घेता २१५ जागांवर एकमत होणे अपेक्षितच आहे. कारण, तीन पक्षांचे मिळून संख्याबळ जवळपास तेवढेच आहे.

पितृपक्षाची अडचण असली तरी निश्चित झालेल्या उमेदवारांना वैयक्तिकरीत्या कळवावे म्हणजे अनिश्चितता संपेल आणि उमेदवारांना प्रचाराला लागता येईल, असा भाजपमध्ये सूर आहे. त्यामुळे पितृपक्षात उमेदवारांना तसा निरोप जाऊ शकतो.

टॅग्स :निवडणूक 2024महाराष्ट्रभाजपाराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस