Maharashtra Politics: राज्यात पदवीधर मतदारसंघाच्या ४ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. नाशिकच्या उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे, काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण, सुधीर तांबे यांनी अर्ज माघारी घेतला, दरम्यान तांबे यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरुन नाशिक पदवीधर निवडणुकीत उडी घेतली आहे. तर दुसरीकडे काल भाजपच्या स्थानीक कार्यकर्त्यांनी तांबे यांना पाठिंबा दिला आहे, या संदर्भात आज मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, काल भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची सत्यजीत तांबे यांनी भेट घेतली. माझ्याशी त्यांनी निवडणुकी संदर्भात चर्चा केली. पक्षाने पाठिंबा जाहीर केल्याचे मला आठवत नाही. पण, सत्यजीत तांबे यांना निवडून आणण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.
राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने शिवसेनेच्या शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला आहे. काँग्रेसने सुधीर तांबे यांच्यावर कारवाई केल्याचे बोलले जात आहे.
गेल्या १३ वर्षापासून नाशिक पदवीधर मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात असून यंदाही काँग्रेस विजयी होईल असं मानलं जात होते. परंतु सुधीर तांबे यांनी अखेरच्या क्षणी पुत्रासाठी माघारी घेत सत्यजित तांबेंना अपक्ष म्हणून पुढे केले. त्यामुळे काँग्रेसला फटका बसला. तांबेंनी पक्षाची फसवेगिरी केली असा आरोप प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला. त्यात या संपूर्ण घडामोडीत सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात कुठे होते असा प्रश्न उभा होत आहे. मात्र काही दिवसांपूर्वी तांबेंना भाजपाकडून उमेदवारी नको, म्हणून बाळासाहेब थोरातांनी भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याला फोन करून विनंती केल्याचं सूत्रांच्या हवाल्याने पुढे आले आहे.