Maharashtra Politics : मोठी बातमी! विधानसभेतून अबू आझमी निलंबित; औरंगजेबाची प्रशंसा करणं भोवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 12:23 IST2025-03-05T12:23:33+5:302025-03-05T12:23:45+5:30
आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबबाबत मोठं विधान केलं होतं.

Maharashtra Politics : मोठी बातमी! विधानसभेतून अबू आझमी निलंबित; औरंगजेबाची प्रशंसा करणं भोवलं
Maharashtra Politics ( Marathi News ) : मुंबई - विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. पहिल्याच दिवशी आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब याच्यावर एक विधान केले होते. औरंगजेबाचे कौतुक केले होते. यावरुन विधिमंडळात गदारोळ उडाला होता. विरोधी पक्षातील आमदारांसह सत्ताधारी पक्षातील आमदारांनी अबू आझमी यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली होती. दरम्यान, आज अबू आझमी यांच्याविरोधात विधिमंडळात निलंबनाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. हा प्रस्तान सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून अबू आझमी यांचे निलंबन करण्यात आले आहे.
सपा आमदार अबू आझमी यांचं निलंबन किती काळासाठी करण्यात यावं यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. मंत्री चंद्रकांत पाटलांनी विधानसभेमध्ये अबू आझमींच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. सुधीर मुनगंटीवार यांनी आपली आक्रमकपणे भूमिका मांडली. यावेळी अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आवाजी मतदान घेतलं. या आवाजी मतदानामध्ये एकमताने ठराव मंजूर झाल्याचं जाहीर केलं. अबू आझमी यांना आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सहभागी होता येणार नाही. अधिवेशन कालावधी संपेपर्यंत अबू आझमींवर विधानसभेच्या इमारतीच्या आवारात येण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाची प्रशंसा केल्याच्या मुद्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंगळवारी प्रचंड गदारोळ झाला होता, सत्तापक्षाच्या आमदारांनी गोंधळ घालत कामकाज वारंवार बंद पाडले. शेवटी कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. दरम्यान, आता आज आझमी यांच्यावर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे.
मुंडे यांच्यानंतर आणखी एक मंत्री गोत्यात; महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा गंभीर आरोप
सभागृहात काल गोंधळ
विधानसभेत सभागृहाचे कामकाज तीन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी, तर विधान परिषदेत दोनवेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात येत असल्याचे अनुक्रमे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सभापती राम शिंदे यांनी जाहीर केले. विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे महेश लांडगे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री उदय सामंत, अतुल भातखळकर, योगेश सागर यांनी अबू आझमींवर हल्लाबोल केला.
घोषणांनी सभागृह दणाणले
भाजप-शिंदेसेनेचे आमदार वेलमध्ये उतरले आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’, अशा घोषणांनी त्यांनी सभागृह दणाणून सोडले. औरंगजेबाची महाराष्ट्रातील कबर उद्ध्वस्त केली पाहिजे, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली. उद्धव सेनेचे आमदारही शेवटी आक्रमक झाले आणि त्यांनीही घोषणाबाजी केली, त्यांच्यापैकी कोणाला बोलण्याची संधी मिळण्याआधीच कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
विधान परिषदेत पडसाद
विधान परिषदेतही विरोधक आणि सत्ताधारी सदस्यांनी गदारोळ करून कामकाज रोखून धरले. सभापतींसमोरील मोकळ्या जागेत धाव घेत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जयजयकार करत त्यांनी अबू आझमींविरोधात घोषणा दिल्या. सभागृह नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू आझमींचा धिक्कार करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले. आझमींना बडतर्फ करण्याची मागणीही त्यांनी केली.