Maharashtra Politics ( Marathi News ): 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'ची राज्यभर चर्चा सुरू आहे. या योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यावर जमा झाला आहे. यामुळे या योजनेची कौतुकही सुरू आहे. योजनेची लोकप्रियताही वाढली असून आता महायुतीमध्ये योजनेवरुन श्रेयवाद सुरू असल्याचे दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाच्या जनसन्मान यात्रेत या योजनेची जाहीरात सुरू आहे, यावरुन आता श्रेयवाद सुरू असल्याचे दिसत आहे, तर दुसरीकडे शिंदे गटाकडूनही श्रेयवाद सुरू असल्याचे दिसत आहे, दरम्यान, आता मंत्री उदय सामंत यांनी यावरुन प्रतिक्रिया दिली.
शेख हसीना देशात परत जाणार? बांगलादेशात व्हायरल 'कॉल'ची चर्चा; नेमकं प्रकरण काय?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओवरुन लाडकी बहीण नक्की कोणाची असा प्रश्न उपस्थित केला आहे. व्हिडिओमध्ये ‘दादाचा वादा’, ‘अजितदादांची लाडकी बहीण योजना’, ‘माझ्या अजितदादाने पैसे पाठवले’ असे संवाद या जाहिरातींमध्ये पाहायला व ऐकायला मिळत आहेत. “महिलांच्या बँक खात्यात येणारे १५०० रुपये ही भेट नाही तर माझ्या दादाचं प्रेम आहे, असा संवाद दिसत आहे. दरम्यान, यावरुन महायुतीतील नेत्यांमध्ये टोलेबाजी सुरू असल्याचे दिसत आहे.
आज पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री उदय सामंत यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. उदय सामंत म्हणाले, 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने आलेली योजना आहे. महायुतीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपुमख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी ही योजना स्विकारली. त्यानंतर तो विषय कॅबिनेटसमोर आला. कॅबिनेटसमोर विषय आल्यानंतर तिथेही ही संकल्पना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आहे असा विषय झाला. त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उचलून धरली. त्यामुळे मला असं वाटतं की श्रेयवादात जाण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांच्या डोक्यातून आलेली संकल्पना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उचलून धरली आणि कॅबिनेटने त्याला मंजूरी दिली, असंही उदय सामंत म्हणाले.
जागावाटपाची चर्चा सुरू झाली
"अजित पवार गटाची २५ जणांची यादी कुठून येते हे मला माहित नाही, राष्ट्रवादीच्या जागा संदर्भातील चर्चा कुठेही झालेली नाही, असंही सामंत म्हणाले. "तिकीट वाटपाच्या जागा संदर्भातील चर्चा मात्र सुरू झाली आहे. सन्मानपूर्वक तिन्ही पक्षाला तिकीट वाटप होईल. तुमच्याकडे येणारी माहिती कुठून येते हे आम्हाला माहीत नाही, असा सवाल सामंत यांनी पत्रकारांना केला.