Maharashtra Politics ( Marathi News ) : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप होणार असल्याचा दावा शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी केला आहे. ठाकरे गटातील आणखी दोन खासदार काही दिवसातच शिंदे गटात येणार असल्याचा दावा नरेश मस्के यांनी केला. यामुळे आता राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच मोठी राजकीय घडामोड होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
मुस्लीम आरक्षणासंदर्भात TDP चा मोठा दावा; शपथविधीपूर्वीच भाजपचं टेन्शन वाढवलं!
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे ९ खासदार निवडून आले आहेत. दरम्यान, शिंदे गटाचे सात खासदार निवडून आले आहेत, यामुळे राज्यात पुन्हा ठाकरेंची जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, आता नरेश म्हस्के यांनी मोठा दावा केला आहे. "ठाकरे गटाचे ९ खासदार निवडून आले आहेत. यापैकी दोन खासदार आमच्या संपर्कात आहेत. दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधल्याचा दावा नरेश मस्के यांनी केला आहे.
"आपल्या मतदारसंघातील विकासकामे झाली पाहिजेत, अशी त्या खासदारांची इच्छा आहे. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतो असं सांगितलं आहे. मुल्ला मौलवींना पैसे देऊन मते विकत मिळवण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका आम्हाला पटलेली नाही, असं या खासदारांनी आम्हाला सांगितले, असंही मस्के म्हणाले. पक्षांतर बंदीची कारवाई रोखण्यासाठी या दोन खासदारांनी प्लॅनही आखला आहे, आम्ही सहा खासदारांची लवकरच संख्या जमवतो आणि लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान मोदी साहेबांना पाठिंबा देऊ, असंही ते दोन खासदार म्हणाले आहेत, असा दावाही म्हस्के यांनी केला.
शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकांआधी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे. दरम्यान, आता लोकसभेचे निकाल समोर आल्यानंतर आता विधानसभांच्या निवडणुका काही दिवसातच जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सगळ्याच पक्षांनी केली आहे.