Join us  

अजित पवारांच्या बैठकीत नवाब मलिकांची हजेरी, भाजपा नेत्यांची आली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "आमची तीव्र..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 10:07 AM

काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत माजी मंत्री नवाब मलिक उपस्थित होते.

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होणार आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे निवडणूक होण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बैठक घेतली. या बैठकीत माजी मंत्री नवाब मलिक यांनी हजेरी लावली, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. 

फडणवीसांच्या विरोधानंतरही अजित पवारांच्या बैठकीला नवाब मलिक हजर; महायुतीत वाद उफाळणार?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल देवगीरी बंगल्यावर बैठक बोलावली होती. या बैठकीत  राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. या बैठकील नवाब मलिक उपस्थित राहिल्याने आता महायुतीमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. याआधी नवाब मलिक नागपूर येथील अधिनेशनात सत्ताधारी गटात बसल्याने मोठा वाद सुरू झाला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहित नाराजी व्यक्त केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहित नाराजी व्यक्त केली होती, त्यांनी स्पष्टपण भाजपाची भूमिका सांगितली होती. दरम्यान, आता नवाब मलिक यांनी बैठकीलाच हजेरी लावल्याने महायुतीत वाद होण्याची शक्यता वर्तवली आहे.याबाबत भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे, त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

भाजपा नेते अतुल भातखळकरांनी नाराजी व्यक्त केली

"नवाब मलिक जर राष्ट्रवादीच्या बैठकीला गेले असतील तर आमची पुन्हा एकदा तीव्र नाराजी प्रकट करतो. जी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली तिच भूमिका आमची आजही कायम आहे,  नवाब मलिक यांना कोणत्याही परिस्थितीत महायुतीमध्ये स्थान देण्यात येणार नाही. ही आमची स्पष्ट भूमिका आहे, यात कोणताही बदल होणार नाही, अशी भूमिका आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केली. 

"काल नवाब मलिक बैठकीला आले होते की नाही याची आम्हाला कल्पना नाही, असंही भाजपा नेते अतुल भातखळकर म्हणाले. 

महायुतीत वाद उफाळणार?

  मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपामुळे अटकेची कारवाई झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी वैद्यकीय कारणास्तव नवाब मलिक हे जामिनावर तुरुंगाबाहेर आले आहेत. तुरुंगाबाहेर येताच नवाब मलिकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आपलं समर्थन दिलं होतं. तसंच अधिवेशन काळात ते सत्ताधारी बाकांवरही बसले होते. मात्र गंभीर आरोप असलेले मलिक हे महायुतीसोबत नकोत, अशी भूमिका घेत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांना पत्र लिहिलं होतं. हे पत्र सार्वजनिक करण्यात आल्याने अजित पवार काहीसे नाराजही झाले होते. मात्र त्यानंतर मलिक यांना पक्षाच्या बैठकांपासून दूर ठेवण्यात आलं. परंतु आता पुन्हा एकदा नवाब मलिक हे राष्ट्रवादीच्या बैठकीला हजर झाल्याने अजित पवारांनी भाजपचा विरोध झुगारून नवाब मलिकांना पुन्हा पक्षासोबत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे का, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसविधानसभाभाजपादेवेंद्र फडणवीस