मुंबई - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल एका कार्यक्रमात शिवसेना आणि भाजपला निवडणुकीत जागा वाटपावरुन भाष्य केले. यात त्यांनी शिवसेनेला ४८ जागा द्यायच्या असल्याचे वक्तव्य केले. यावरुन आता आरोप-प्रत्योप सुरू झाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
'भाजप शिंदे गटाला ४८ जागा सोडायला तयार दिसतेय, परंतु अजून एक वर्ष निवडणुकीला असून, २८८ जागा भाजप चिन्हावरच लढवल्या जातील आणि त्यानंतर शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही, अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व्यक्त केला. ( Maharashtra Politics News )
जयंत पाटील म्हणाले, एकदा भाजप महाराष्ट्रात निवडणूका लढवेल आणि महाविकास आघाडीच्या समोर फक्त एकटा भाजप असेल शिंदे गट तोपर्यंत टिकेल असे मला वाटत नाही ,अशी शक्यताही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
"सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विकत घेण्याची शिंदे गटाची तयारी", राऊतांचा गंभीर आरोप
भाजपला स्थानिक पक्ष, राज्यस्तरावरील पक्ष, त्यांचे अस्तित्व त्यांना मान्य नाही. भाजपला असं वाटतंय की आपली मते हे पक्ष खाणार आहेत, त्यामुळे स्थानिक पक्षांना संपवण्याचे काम अव्याहतपणे प्रत्येक राज्यात भाजपने केले आहे. त्यांचा मित्र असो या शत्रू असो त्यांना फोडणे त्यांच्यावर वेगवेगळ्या कारवाया करणे आणि त्यांना नामोहरम करुन त्यांच्या मागे जाणारी मतं आपल्या मागे वळवणे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम असतो असंही जयंत पाटील म्हणाले.
'शिंदे गट राहणार की नाही हा प्रश्न लोकांच्या मनात आहेच, यदाकदाचित राहिला तर भाजप सर्वे करेल आणि जाहीर केलेल्या ४८ जागांपैकी एकनाथ शिंदे यांना सांगतील तुमच्या ५-६ जागा निवडून येणार आहे. त्यामुळे उरलेल्या ठिकाणी आम्ही वेगळा पर्याय देतो. अशी परिस्थिती शेवटच्या क्षणी निर्माण होईल असेही जयंत पाटील (Jayant Patil) यांनी स्पष्ट केले.
'अजून सव्वा वर्ष निवडणुकीला असताना ४८ जागा शिंदे गटाला आहेत ते निवडणूकीच्या जवळ आल्यावर शिवसेनेच्या किंवा शिंदे गटाच्यावतीने जो काही त्यांचा पक्ष असेल त्यांना ५-६ जागा मिळतील. बाकीच्या सगळ्या भाजपच्या नावावर लढवल्या पाहिजे असे ऐनवेळी शिंदेंना (Eknath Shinde) सांगितले जाईल, असंही जयंत पाटील म्हणाले.