Maharashtra Politics ( Marathi News ) : राज्यात विधानसभा निवडणुका काही दिवसातच जाहीर होणार असून सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुतीनेही तयारी सुरू केली आहे. पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' सुरू केली. या योजनेची राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधकांनी या याजनेवरुन शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर आरोप केले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही योजना निवडणुकांसाठी असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, आता महायुतीतील आमदार रवी राणा यांनी आज या योजनबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
महिलांना महिन्याला मिळणार १५०० रुपये; मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी कसा करायचा अर्ज?
अमरावती येथे आज आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र वितरण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बोलताना आमदार रवि राणा म्हणाले, आमचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये हे आम्ही दुप्पट म्हणजेच ३००० करु, तर आता यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. पण, ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून १५,०० रुपये वापस घेणार, असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महीला उपस्थित होत्या.
आमदार रवी राणा यांच्या या वक्तव्याने आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, ही योजना फक्त निवडणुकीसाठी असल्याची टीका विरोधक करत आहेत. तर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार या योजनेचे पैसे मिळणारच असं सांगत आहेत. योजना सुरूच राहीलं असंही सांगत आहेत, दरम्यान, आता आमदार रवी राणा यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
कोणाला मिळणार लाभ?
महाराष्ट्रातील २१ ते ६० वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
१) लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. २) राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला. ३) कमीत कमी २१ वर्ष ते जास्तीत जास्त ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत अर्ज करता येणार.४) या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक आहे. ५) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
या निकषांची पूर्तता करणाऱ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार?
१) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज२) लाभार्थी महिलेचे आधार कार्ड३) महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील जन्म दाखला.४) सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला. ५) बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत. ६) पासपोर्ट आकाराचा फोटो७) शिधा पत्रिका (रेशन कार्ड)८) योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र.