मुंबई- गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती. यावर कोर्टाने निकाल दिला. १६ आदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार असल्याचा निर्णय कोर्टाने दिला. यात न्यायालयाने किमान रिजनेबल टाईम मध्ये आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय द्यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
याबाबत दोन दिवसापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली. आमदार अपात्रतेबाबत घाई करायची नाही व विलंबही करायचा नाही यात जो निर्णय होईल तो संविधानातील तरतुदी व न्यायालयाच्या निर्देशानुसारच घेतला जाईल, असं नार्वेकर यांनी स्पष्ट केले. यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लोकसभेसाठी १६-१६-१६ चा फॉर्म्युला ठरला? राऊतांनी वेगळाच आकडा सांगितला...
जयंत पाटील म्हणाले, न्यायलयाने सांगितलं रिजनेबल टाईममध्ये अपात्रतेचा निर्णय घ्या. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जो निर्णय ठरवतील तो रिजनेबल टाईम आहे. रिजनेबल टाईम म्हणजे तो एक वर्षाचा आहे की तीन महिन्याचा घेतात याची सर्वोच्च न्यायालयच वाट पाहत आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालास बगल देण्याचे काम केले आहे.
'विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमचे जावई आहेत ते तसं करणार नाहीत, आमचा त्यांच्यावर विश्वास आहे, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. ते लवकरात लवकर निकाल लावतील, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. मात्र भाजप निवडणुका लांबवत जाण्याचे काम करीत असून त्यास राष्ट्रवादीला जबाबदार धरत आहे. प्रत्यक्षात, राष्ट्रवादी नव्हे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच निवडणुकांना विलंब होत आहे,असंही जयंत पाटील म्हणाले.