Join us  

Sharad Pawar : शरद पवारांच्या राजीनाम्याचा महाविकास आघाडीवर परिणाम होणार का? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2023 4:45 PM

शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याची घोषणा केली.

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज मोठी घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन मी निवृत्त होणार असल्याची मोठी घोषणा पवार यांनी केली. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये 'लोक माझा सांगाती' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ही घोषणा केली. या राजीनाम्यावर आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. शिवेसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत म्हणाले, शरद पवार यांच्यासारखा माणूस राजकारणातून कधीही निवृत्त होत नाही. शरद पवार राजकारणाातून निवृत्त झालेले नाहीत, त्यांनी फक्त अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या गोंधळ सुरू आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या पक्षावर बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. 

Sharad Pawar | सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या १५ दिवसांत दोन राजकीय स्फोट... पहिला शरद पवारांची निवृत्ती, दुसरा काय?

"शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचा महाविकास आघाडीवर परिणाम होणार नाही. देशाला आणि महाराष्ट्राला शरद पवार यांच्या नेतृत्वाची गरज आहे. एखाद्या पदावरुन दूर होणे म्हणजे राजकारणातून दूर होणं असं काही नाही. पवार यांनी हा घेतलेला निर्णय का घेतला हे तेच सांगू शकतील. १९९० च्या दरम्यान शिवसेना प्रमुख पदाचा बाळासाहेब ठाकरे यांनीही राजीनामा दिला होता, पण लोकांच्या रेट्यामुळे त्यांनी काही दिवसांनी तो राजीनामा परत घेतला त्या प्रसंगाचा मी साक्षीदार आहे, असे नेते काही विशिष्ठ परिस्थीतीत असे निर्णय घेत असतात त्यातलाच हा एक निर्णय असल्याचं मला वाटत आहे, असंही राऊत म्हणाले. 

"आमचा सध्या एकमेकांशी संवाद सुरू आहे. या निर्णयाचा महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत घडामोडीवर मी कोणतही भाष्य करणार नाही. शरद पवार साहेब मोकळे असतील तेव्हा आम्ही त्यांची भेट घेणार आहे, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.  

'राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार'

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन मी निवृत्त होणार असल्याची मोठी घोषणा आज शरद पवार यांनी केली. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये लोक माझा सांगती या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ही घोषणा केली. 

यापुढे मी तीनच वर्ष राजकारणात राहणार आहे. राष्ट्रवादीच्या पुढच्या अध्यक्षपदासाठी नवीन समिती स्थापन करणार. नवीन समिती अध्यक्षपदाचा निर्णय घेईल, असंही शरद पवार म्हणाले.   

यावेळी सभागृहातील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. सभागृहात शरद पवार यांच्या घोषणा सुरू होत्या. यावळी बोलताना शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिल्या. 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनासुप्रिया सुळे