Maharashtra Politics ( Marathi News ) : मुंबई- गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. दोन्ही कुटुंबाची जवळीकही वाढल्याचे दिसत आहे. अधिवेशनात आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पाठराखण केली होती. तर दुसरीकडे एका कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचे दिसले. यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात ठाकरे बंधू एकत्र येणार का, अशा चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आता यावर शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
'त्या' कामासाठी शरद पवारांनी उद्योगपती गौतम अदानी यांचं कौतुक केलं; नेमकं प्रकरण काय?
काल एका कार्यक्रमात शर्मिला ठाकरे यांना पत्रकारांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याच्या व्हिडीओवर प्रश्न विचारला यावर बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, माझ्या नंणदेच्या मुलाचा साखरपुडा होता. घरातील सर्व लोक अशावेळी एकत्र येतात. माझी नणंद राजकारणात नाही. राज जसा तिचा भाऊ आहे, तसाच उद्धवही भाऊ आहे", असं ठाकरे म्हणाल्या. यानंतर पत्रकारांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? असा प्रश्न विचारला यावर शर्मिला ठाकरे यांनी 'बघुया' असं एका शब्दात उत्तर दिले. यामुळे आता राजकीय वर्तुळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येणार का? यावर जोरदार चर्चा सुरू आहेत.
दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप
काही दिवसांपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने धारावीतील पूनर्विकास प्रकल्पाविरोधात मोर्चा काढला होता. यावरुन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या आरोप-प्रत्यारोप झाले होते. 'सेटलमेंट झाली नसेल म्हणून हा मोर्चा काढला असेल',अशी टीका राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर केली होता.यावरुन दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप सुरू होते. तर दुसरीकडे अधिवेशनात आमदार आदित्य ठाकरेंवर दिशा सालियन प्रकरणी आरोप झाले. यावर शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली होती. 'आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणी सहभाग असेल असं मला वाटत नाही, असं ठाकरे म्हणाल्या होत्या. यावर उद्धव ठाकरे यांनी शर्मिला ठाकरे यांचे आभारही मानले होते.
यानंतर काहीच दिवसात एका कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.