Maharashtra Politics: सत्तांतराचे राजकारण लांबण्याची शक्यता, ही आहेत कारणं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 08:40 AM2022-06-23T08:40:05+5:302022-06-23T08:41:37+5:30
Maharashtra Politics: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन सोडल्यानंतर महाराष्ट्रातील बंडाचे राजकारण लांबत जाण्याची शक्यता वाढली आहे. उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना समोर येऊन बोलण्याचे आवाहन केले आहे परंतु, सध्याच्या ताणलेल्या परिस्थितीमध्ये ही शक्यता तूर्त वाटत नाही.
- विनायक पात्रुडकर
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन सोडल्यानंतर महाराष्ट्रातील बंडाचे राजकारण लांबत जाण्याची शक्यता वाढली आहे. उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना समोर येऊन बोलण्याचे आवाहन केले आहे परंतु, सध्याच्या ताणलेल्या परिस्थितीमध्ये ही शक्यता तूर्त वाटत नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये सामान्य शिवसैनिकांना पुन्हा आपलेसे करून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र उद्भवलेला राजकीय पेचप्रसंग सोडविण्यासाठी हालचाली होत असल्याचे चित्र दिसले नाही. राजीनाम्याच्या अटकळी चुकीच्या ठरवित उद्धव ठाकरे यांनी निर्णयाचा चेंडू एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात टाकला. तसेच माझ्या ठिकाणी दुसरा कोणीही शिवसैनिक मुख्यमंत्री बनवायला तयार असल्याचे सांगितले. एक प्रकारे त्यांनी एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री बनण्याचा सल्ला दिला. गुवाहाटी येथे असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून हा प्रस्ताव कितपत स्वीकारला जाईल, याविषयी जाणकारांमध्ये तर्कवितर्क व्यक्त
होत आहेत. जाहीर बंडामुळे आणि भाजपशी सलगी जाहीर झाल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे समर्थक शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून कितपत स्वीकारतील हा एक प्रश्न आहे. त्याच प्रमाणे काँग्रेसमधील ज्येष्ठ मंत्रीही या प्रस्तावाला कितपत पाठिंबा देतील याविषयी शंका आहे. केवळ आघाडी सरकारमधील इतर पक्षांचे नेतेच नव्हे तर शिवसेनेतील उद्धवनिष्ठ आमदारही शिंदेना किती सहकार्य करतील याविषयी साशंकता आहे. याशिवाय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून दूर व्हा, म्हणून सांगणारा मंत्री अशी प्रतिमा तयार होईल. यामुळे शिंदेच स्वतः प्रस्ताव धुडकावून लावतील.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आघाडी सरकार सत्तेवरुन खाली खेचायचे असल्याने शिंदे यांच्या बंडाळीला जेवढे खतपाणी घालता येईल तेवढा प्रयत्न भाजपचे वरिष्ठ करणार याविषयी शंका नाही. या एकूण परिस्थितीमुळे उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतरही राज्यातल्या राजकीय पेचप्रसंगावर कोणताही तोडगा निघालेला नाही.
राज्यपाल कोश्यारी कोरोनामुळे शांत असले तरी येथे एक दोन दिवसात ते पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्याचेही पडसाद सध्याच्या अस्थिर राजकीय पटलावर पडतील.
उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री, आम्ही संघर्ष करीतच राहणार, असे ट्विट खा. संजय राऊत यांनी सायंकाळी केल्याने हा संघर्ष लवकर मिटण्याची चिन्हे सध्यातरी दिसत नाही.