Join us

"एवढा आत्मविश्वास कुठून येतो"; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 1:36 PM

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Mumbai Lok Sabha Election : सोमवारी मुंबईसह राज्यात १३ लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं. मुंबईतल्या सहा मतदारसंघामध्ये यंदा कमी प्रमाणात मतदान झाल्याचे पाहायला मिळत आहे. ईव्हीएम मशीन्स बंद पडल्याने मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेक मतदार हे मतदान न करताच माघारी फिरले. यावरुन शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाचे अधिकारी पक्षपातीपणे वागले असल्याचा आरोप केला होता. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिक्रिया दिली.

ठाकरे गटाला भरघोस प्रतिसाद मिळत असलेल्या वसाहतींमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांकडून जाणूनबुजून दिरंगाई करण्यात आली, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. काम करणार्‍या प्रशासकीय यंत्रणेवर, निवडणूक यंत्रणेवर संशय घेणे हे उद्धव ठाकरे यांचे सततचे रडगाणे आहे अशी टीका उमेश पाटील यांनी केली.

"एकीकडे आरोप करताना उद्धव ठाकरे त्याच निवडणूक प्रक्रियेतून सामोरे जात आहेत आणि दुसरीकडे छातीठोकपणे आमचे एवढे खासदार निवडून येणार असे सांगतात. मग आपला या यंत्रणेवर विश्वासच नाही तर कशाच्या आधारावर हा आत्मविश्वास आहे. ही यंत्रणा एकतर्फी काम करतेय. तर मग तुम्हाला निवडून येण्याची खात्री कुठून आली. महाविकास आघाडीच्या ३० - ३५ जागा येतील हे कशाच्या आधारावर बोलत आहात," असा सवाल उमेश पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला.

"उद्धव ठाकरे यांचे हे बोलणे दुटप्पी असून सर्वच शहरात मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. ऊन्हाचा वाढलेला पारा आणि मतदारांचा निरुत्साह यामुळे मतदान कमी झाले. आता हे कमी का झाले यावर राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे. याची त्यांनी नोंद घेतली पाहिजे," असेही उमेश पाटील म्हणाले.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

"वेगवेगळे पुरावे मागून मतदारांचा छळ केला गेला. निवडणूक आयोगाचे अधिकारी पक्षपातीपणे वागले असून आयोगाने मोदींच्या घरगड्यासारखे काम केल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. पराभवाच्या भीतीने पछाडलेल्या भाजपने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून विरोधकांच्या मतपेटी क्षेत्रात कमी मतदानाचा खेळ खेळला," असा आरोप उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर केला होता.

टॅग्स :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४उद्धव ठाकरेराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवारभारतीय निवडणूक आयोग