मुंबई- काल छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा झाली. या सभेत महाविकास आघाडीतील नेत्यांनी उपस्थिती लावली, यावेळी सर्वच नेत्यांसाठी व्यासपीठावर बसण्यासाठी एकसारख्या खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. पण, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वेगळी खुर्ची ठेवली होती. यावरुन राज्यभरात अनेक राजकीय चर्चा रंगल्या. या चर्चेवर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं. अजित पवार म्हणाले, छत्रपती संभाजीनगरमधील सभेला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. दुसरी सभा आता नागपुरला होणार आहे. प्रत्येक सभेला सर्वच नेते उपस्थित असतील असं नाही. प्रत्येक पक्षाचे दोन-दोन नेते बोलतील असं आमचं ठरलं आहे, सगळेच नेते बोलतील असं नाही. त्यामुळे कोणही नाराज आहे, अशा चर्चा करु नयेत, असंही अजित पवार म्हणाले. (Maharashtra Politics )
'काल काहींनी उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवरुन उलट सुटल चर्चा केल्या. याची मला गंमत वाटत आहे, काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पाठिचे एक ऑपरेशन झाले आहे. त्यामुळे त्यांना पाठिमागे ताठ असणारी खुर्ची ठेवली होती, त्यामुळे त्यांची वेगळी खुर्ची दिसत आहे, आमच्यात असं वेगळ काही नाही. आमच्यात बसण्यामध्ये भेदभाव असल्याच्या चर्चा काहींनी केल्या. पण, असं आमच्यात काही नाही. आम्ही एकोप्याने जात आहोत, असं स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलं.
'आमच्या सभेला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. पहिल्या भाषणापासून शेवटच्या भाषणापर्यंत लोक थांबली होती. आता दुसरी सभा नागपुरला होणार तर तिसरी सभा १ मे ला मुंबईला यानंतर पुण्याला होणार आहे. आम्ही सभेसाठी काही धोरण तयार केली आहेत. यात प्रत्येक पक्षातील दोन-दोन नेत्यांना बोलण्याची संधी दिली आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. (Maharashtra Politics )