Join us  

अनिल देशमुखांनी आरोप केलेले समित कदम कोण आहेत? अचानक चर्चेत कसे आले?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 11:43 AM

Anil Deshmukh Devendra Fadnavis : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले.

 Anil Deshmukh Devendra Fadnavis ( Marathi News ) : देशातील लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने मोठं यश मिळवले. तर महायुतीला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. राज्यात काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका होणार असून राजकीय वर्तुळात आतापासूनच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.  '३ वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे मिरजचे समित कदम या व्यक्तीला ५-६ वेळा पाठवलं होतं. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवारांवर मी खोटे आरोप करायचे. त्या खोट्या आरोपाचे प्रतिज्ञापत्र द्यायचं असं मला सांगितले होते', असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केली. या आरोपांमुळे आता समित कदम एकदा चर्चेत आले आहेत. 

...तर ठाकरे पिता पुत्र आज जेलमध्ये असते; अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

मिरजचे समित कदम यांनी आतापर्यंत कोणतीही निवडणूक लढवली नसल्याची माहिती समोर आली आहे. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी समित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटोही दाखवले आहेत. 

समित कदम कोण आहेत?

समित कदम हे मुळचे मिरजेचे आहेत. त्यांनी जनसुराज्य युवा शक्तिमध्ये २००८ पासून काम करत आहेत. आता ते जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आमदार विनय कोरे यांच्यासोबत ते काम करतात, समित कदम हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यांनी आतापर्यंत एकही निवडणूक लढलेली नाही. फम, येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत ते इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसापूर्वी मिरजमध्ये तसे बॅनर्सही लावण्यात आले होते. मिरजेत ते वेगवेगळे कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. गेल्या वर्षी त्यांनी दही हंडीचा आयोजित केली होती. 

समित कदम चर्चेत कसे आले?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दोन दिवसापूर्वी अनिल देशमुख यांनी फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. यात ते म्हणाले, '३ वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे मिरजचे समित कदम या व्यक्तीला ५-६ वेळा पाठवलं होतं. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवारांवर मी खोटे आरोप करायचे. त्या खोट्या आरोपाचे प्रतिज्ञापत्र द्यायचं असं मला सांगितले होते', या आरोपामुळे समित कदम चर्चेत आले आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही आरोप केले. राऊत म्हणाले की, समित कदम यांना वाय दर्जाचे सुरक्षा कशी काय मिळाली? समित कदम या व्यक्तीने असे कोणते काम केले आहे की, त्याला वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. राज्याचा गृहमंत्री कोण आहे? आम्ही अजून उत्खनन करू. देवेंद्र फडणवीस यांनी अशा अजून किती लोकांना सुरक्षा दिली आहे हे तपासावे लागेल, असंही खासदार संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसअनिल देशमुखभाजपाराष्ट्रवादी काँग्रेस