विधान भवनाला घेराव घालण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रसचा मोर्चा
By मनोहर कुंभेजकर | Published: March 21, 2023 05:52 PM2023-03-21T17:52:01+5:302023-03-21T17:52:34+5:30
पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडत ३५ मोर्चेकरांना आझाद मैदाना जवळ अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
मुंबई-केंद्रातील भाजप सरकार आणि शिंदे फडणवीस सरकार मुळे वाढलेली महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमीभाव, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचा झालेला अतोनात नुकसान त्याचे पंचनामे लवकरात लवकर करून शेतकऱ्यांना भरीव अशी मदत झाली पाहिजे, शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत व मुंबई युवक काँग्रेसचा अध्यक्ष आमदार झीशान सिद्दिकी यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाला घेराव घालण्यासाठी महाराष्ट्र युवक काँग्रेसने आज मुंबईत मुंबई काँग्रेस कार्यालय, आझाद मैदान येथून मोर्चा काढला. मात्र पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडत ३५ मोर्चेकरांना आझाद मैदाना जवळ अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
याबाबत अधिक माहिती देतांना कुणाल राऊत म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकार आणि शिंदे फडणवीस सरकार मुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. घरगुती गॅस, डिझेल व पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. सरकारच्या शासकीय अनेक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहेत,परंतू भाजप सरकार जाणून बुजून नोकर भरती करत नाही. आज शेतकरी हवालदिल झाला असून हे सरकार शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव जाहीर करत नाही.
अवकाळी पाऊस आणि गारपीट मुळे शेतकऱ्यांचे आणि शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे, परंतू शिंदे फडणवीस सरकार अजून ही पंचनामे करून ताबडतोब मदत करत नाही आहे. शेतमालाला योग्य हमीभाव त्वरित जाहीर करा आणि सर्व पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना चांगली आर्थिक मदत करावी. या दोन्ही गोष्टींमुळे आपला बळीराजा वाचेल आणि आनंदी होईल अशी भूमिका त्यांनी विषद केली. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी ही सुद्धा महाराष्ट्र युवक काँग्रेसची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.