Join us  

दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्र बंद पडण्याच्या अवस्थेत; पवारांनी सांगितलं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 9:03 PM

महाराष्ट्र सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पात आपण यासंदर्भात भूमिका मांडली होती.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे सोशल मीडियावर एक्टीव्ह असतात. त्यासोबतच, सातत्याने ते मंत्रालयीन स्तरावरही विविध मागण्या घेऊन मंत्रीमहोदयांच्या गाठीभेटी घेत असतात. तर, विविध प्रश्नांवरुन राज्य आणि केंद्र सरकारला प्रश्न विचारत असतात. आमदार पवार यांनी आता राजधानी दिल्लीतीलमहाराष्ट्र परिचय केंद्र आणि पणजी येथील महाराष्ट्र परिचय केंद्र बंद होण्याच्या मार्गावर असल्याची खंत व्यक्त केली आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयातंर्गत गोव्यातील पणजी व राजधानी दिल्लीत हे महाराष्ट्र परिचय केंद्र सुरू आहे.

महाराष्ट्र सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पात आपण यासंदर्भात भूमिका मांडली होती. अधिवेशन काळात आपण महाराष्ट्र परिचय केंद्रातील सद्यस्थितीवर प्रश्न उपस्थित केले होते, असे रोहित पवार यांनी म्हटले. 

मराठी भाषा व संस्कृतीचा प्रसार व्हावा, देशातून आणि परदेशातून येणाऱ्या पर्यटकांना महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा यांचा परिचय व्हावा, मराठी भाषेबद्दल माहिती मिळावी यासाठी विविध राज्यांमध्ये शासनाने महाराष्ट्र परिचय केंद्र सुरु केली आहेत. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन व गोव्यातील पणजी अशा दोन ठिकाणी ही महाराष्ट्र परिचय केंद्रे असून सदर केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांची भरतीच न केली गेल्याने तेथील सांस्कृतिक कार्यक्रम ठप्प पडले आहे. तर, पणजी येथे असलेल्या केंद्रातील 'क' गटातील एकमेव कर्मचाऱ्याचीसुध्दा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माहिती कार्यालयात बदली करण्यात आल्याने ते केंद्र सूध्दा बंद पडण्याच्या स्थितीत आहेत, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.  

रोहित पवार यांनी आता पुन्हा एकदा ट्विटरवरुन यासंदर्भात प्रश्न विचारला आहे. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास, निसर्गसौंदर्य, पर्यटन यांसह विविध गोष्टींचा प्रचार आणि प्रसार केला जातो. सध्या डिजिटल युगात ही केंद्रे डिजिटल होणे गरजेचं असतानाही म्हणावे तितके, याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळेच, ही केंद्र भरतीअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.  

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्रदिल्ली