Join us

महाराष्ट्रासाठी पुढील ५ दिवस महत्वाचे! मुंबईसह 'या' जिल्ह्यात बरसणार मुसळधार, हवामान विभागाने दिला ऑरेंज अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 5:15 PM

आज आणि उद्या महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल. नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

महाराष्ट्रात उशिराने दाखल झालेला मान्सून आता सर्वत्र दाखल झाला आहे. गेल्या २ दिवसांपासून मान्सूनने दमदार हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, हवामान खात्याने मान्सूनबाबत महत्त्वपूर्ण अपडेट दिली आहे. राज्यात आज  मंगळवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

'ती वाचवा वाचवा ओरडत होती, लोक बघत होते; तितक्यात मी पुढे जाऊन कोयता रोखला'

हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या २४ तासांत नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्याने राज्यात २७ आणि २८ जून रोजी नारिंगी आणि पिवळा अलर्ट असेल, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही महत्त्वाच्या भागात आणि कोकणात मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, २९ आणि ३० जून रोजी महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे, मात्र यावेळी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला नाही.

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार २७ जून रोजी राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, रत्नागिरी, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सातारा, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो.

हवामान खात्याने जारी केलेल्या अलर्टनुसार, २८ जून रोजी पालघर, मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी आणि रायगड, नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरी, सातारा, अमरावती, वर्धा आणि नागपूरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार येत्या तीन ते चार तासांत मुंबई आणि रायगडमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. याशिवाय ठाणे, पुणे, पालघर, अहमदनगर, सोलापूर, सातारा, बीड, छत्रपती संभाजीनगर येथे पावसाची शक्यता आहे. याशिवाय वारेही वेगाने वाहू शकतात, असंही हवामान विभागाने सांगितले आहे. 

टॅग्स :मोसमी पाऊसपाऊस