Join us

राज्यातील 'या' जिल्ह्यांत पावसाचे सावट! थंडीही वाढणार; हवामान विभागाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 9:59 AM

हवामान विभागाने राज्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने बंगालच्या उपसागरातून राज्यात बाष्पयुक्त वारे वाहण्याची शक्यता असून त्यामुळे पुढील काही दिवसात कोकणासह मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे. यामुळे आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसू शकतो, गेल्या दोन दिवसांपासून देशात सर्वच ठिकाणी हवामानात बदल झाला आहे. काही ठिकाणी थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही राज्यात धुक्याचे प्रमाणही वाढले आहे. 

जागावाटपाची चर्चा दाेन आठवड्यात पूर्ण करू; काँग्रेसने ‘इंडिया’तील पक्षांना दिले संकेत

देशातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याच्या थंडीने नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. दिल्लीत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लोकांना प्रचंड थंडीचा अनुभव आला आणि कमाल तापमान १७ अंश सेल्सिअस नोंदले, याशिवाय इतर अनेक राज्यांमध्येही थंडीची लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने ही माहिती दिली. त्यानुसार ५ ते ११ जानेवारी दरम्यान तापमानात घट होण्याची अपेक्षा आहे. हवामानातील या बदलामुळे काही उत्तर भारतीय राज्यांमध्ये थंडीची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे.

राज्यात या ठिकाणी पावसाचा अंदाज

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ५ जानेवारीपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडू शकतो. तर दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता. पुण्यातही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील नागपूरसह अन्य जिल्ह्यात पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. 

या राज्यांमध्ये थंडीची लाट कायम 

IMD चे महासंचालक डॉ मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ते ११ जानेवारी दरम्यान, आम्ही रात्रीच्या तापमानात घट होण्याची अपेक्षा करत आहोत, यामुळे मध्य भारतातील काही भागात थंडीची लाट येऊ शकते. दिवसाचे तापमान देखील सामान्यपेक्षा कमी राहील, यामुळे विशेषतः मध्य प्रदेश, महाराष्ट्राचा उत्तर भाग, उत्तर प्रदेशचा दक्षिण भाग आणि हरियाणा आणि राजस्थानच्या भागात थंडी वाढेल. आम्ही या भागात ५ ते ११ तारखेपर्यंत थंड लाट वाढू शकते.

या राज्यांमध्ये पावसाचा अंदाज

IMD नुसार, पश्चिम विषुववृत्तीय हिंदी महासागर आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावरील पूर्वेकडील लाट आणि कमी दाबाच्या क्षेत्रामुळे, ४ जानेवारीपर्यंत दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ आणि लक्षद्वीपसह दक्षिण भारतात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय उत्तरेकडील राज्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मंगळवार आणि बुधवारी हलका पाऊस पडू शकतो.

दक्षिण-पूर्व अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे, यामुळे लक्षद्वीप आणि मालदीव या दोन्ही बेटांवर ढग निर्माण होत आहेत. आयएमडीचा अंदाज आहे की, येत्या तीन दिवसांत लक्षद्वीपमध्ये ४०-५० किमी प्रतितास वेगाने जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मच्छीमारांनाही समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

टॅग्स :पाऊस