मुंबई: होळीच्या दिवशी मध्यरात्रीपासून मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणावर विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह पाऊस पडला. अचनाक वादळी वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी गारांनीही परिसराला झोडपल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, काही भागांत काश्मीरसदृश्य दृश्य दिसत होते. या गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून रब्बीची पीके खराब झाली आहेत.
राज्यातील विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी गारपीट झाली. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील बंगाली-पिंपळा, कवडगांव, सुशी, वडगाव, चिखली, कोळगाव, पाडळसिंगी, मादळमोही, धोंडराई, उमापूर, कुंभेजळगाव, तलवाडा सह तालुक्यातील अनेक गावातील परिसरात सोमवारी सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होवून काही ठिकाणी गारपीट झाली.
उत्तर महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यातही गारपीट झाली. एक तास चाललेल्या गारपीटीने परिसरात शेतमालाचे मोठं नुकसान केलं आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात प्रचंड गारपीट झाली आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या या गारपिटीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे. यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे व पंचनामे करावेत असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
अचानक पाऊस का पडला?
उन्हाचा पारा वाढलेला आहे. या त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन देखील होत आहे. त्यामुळे त्याचे ढग तयार होऊन पाऊस होत आहे. दिवसा गरम आणि रात्री थंडी जाणवत असल्याने वातावरणात अस्थिरता निर्माण होऊन पावसाचे ढग तयार होत आहेत. असं असलं तरी ही स्थिती काही काळासाठीची आहे.
नाशिकमध्ये पावसाने २ एकर द्राक्षबाग जमीनदोस्त
हवामान विभागाने वर्तवलेला अंदाजानुसार अनेक ठिकाणी वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. याच पावसाचा फटका आता निफाड तालुक्यातील उगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी भाऊसाहेब पानगव्हाणे यांना बसला आहे. त्यांची अक्षरश: दोन एकर द्राक्ष बाग ही आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने जमीनदोस्त झाली. या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मोठ्या कष्टाने या शेतकऱ्याने द्राक्ष बाग जगवली. मात्र आलेल्या वादळी पावसाने या द्राक्षबाग भुईसपाट झाली आणि शेतकऱ्याला आर्थिक कोंडीत सापडला आहे.