मुंबईत अवयवदानाने गाठली पंचाहत्तरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 03:19 AM2019-12-12T03:19:47+5:302019-12-12T03:20:27+5:30
समन्वयकांचे उत्तम काम आणि समाजात वाढत असलेली जनजागृती, यामुळे हे अवयवदानाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.
मुंबई : मुंबईतील खंबाला हिल रुग्णालयात मंगळवारी अवयवदान पार पडले आहे. ७५ वर्षीय महिलेचे अवयवदान करण्यात आले आहे. या महिलेच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे दोन जणांना नव्याने आयुष्य जगण्याची संधी मिळाली आहे. मुंबईतील हे यंदाच्या वर्षातील ७५वे अवयवदान आहे.
याबाबत मुंबईतील विभागीय प्रत्यारोपण समन्वयक केंद्राचे अध्यक्ष डॉ. एस.के माथूर म्हणाले, या रुग्णालयात ७५व्या अवयवदानाची नोंंद करण्यात आली आहे. ७५ वर्षीय महिलेची दोन्ही मूत्रपिंडे दान करण्यात आली आहेत. गेल्या वर्षी मुंबईमध्ये ४८ अवयवदान पार पडले होते. मात्र, यंदाच्या वर्षी ७५ आकडा मुंबईने गाठला आहे. समन्वयकांचे उत्तम काम आणि समाजात वाढत असलेली जनजागृती, यामुळे हे अवयवदानाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.
देशभरात महाराष्ट्राने अवयवदानात पहिला क्रमांक पटकावला. २०१९ मध्ये देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक अवयवदान करण्यात आले. अवयवदानात महाराष्ट्र अव्वल आल्याने, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्याचा पुरस्कार देऊन गौरव केला. महाराष्ट्राने अवयवदानात देशातील आघाडीच्या तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांना मागे टाकले आहे.