Join us

वायू प्रदूषणावरील कृतीसाठी महाराष्ट्र सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:09 AM

आभासी सभेचे आयाेजनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील वायू प्रदूषण राेखून हवेची गुणवत्ता सुधारण्याकरिता परिणामकारक योजना तयार करता ...

आभासी सभेचे आयाेजन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील वायू प्रदूषण राेखून हवेची गुणवत्ता सुधारण्याकरिता परिणामकारक योजना तयार करता यावी, या उद्देशाने राज्यात पहिल्यांदाच या विषयातील तज्ज्ञ, सामान्य नागरिक आणि राज्याच्या पर्यावरण विभागाचे अधिकारी आभासी सभेत एकत्र आले होते. राज्याच्या पर्यावरण कृती कार्यक्रमाच्या निश्चितीसाठी प्रभावी शिफारशी करण्याच्या उद्देशाने ही सभा पार पडली.

पर्पज, असर आणि क्लायमेट ट्रेंड्स या तीन संस्थांचा संयुक्त प्रकल्प असलेल्या क्लायमेट व्हाइसेस आणि माझी वसुंधरा (महाराष्ट्र पर्यावरण विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आभासी सभेचे यजमानपद ना नफा तत्त्वावरील वातावरण फाउण्डेशन आणि सेंटर फॉर सायन्स ॲॅण्ड एन्व्हायरनमेंट (सीएसई) यांनी भूषविले. पर्यावरण दिवसाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केल्या जाणार असलेल्या अशा प्रकारच्या एकूण चार सभांपैकी ही पहिली सभा वायू प्रदूषणावर आयोजित करण्यात आली होती. सभेत सरकारी अधिकारी, संशोधक, डॉक्टर्स, पर्यावरणावर काम करणारे गट, नागरी संघटना, कार्यकर्ते आणि अभ्यासकांनी सहभाग नोंदवला.

पर्यावरण आणि वातावरण बदल विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर सभेला उद्देशून म्हणाल्या, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि विभागात काम करणाऱ्या सर्वांना याची जाणीव आहे की, पर्यावरणावर काही तरी सकारात्मक काम करून वातावरण बदलाचे परिणाम सौम्य करण्यासाठी २०२१-२०३० हे कदाचित शेवटचे दशक आहे. त्यामुळेच सरकारने मुंबई, पुणे, नागपूर यासह सातशे शहरांना तसेच गावांना सामावून घेणारी ‘माझी वसुंधरा’ ही चौफेर प्रचाराची मोहीम सुरू केली आहे.

या सभेतून पुढे आलेल्या शिफारशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमोर पर्यावरणदिनी सादर करण्यात येतील. राज्याचे धोरणकर्ते शक्य तेवढ्या शिफारशींचा वातावरणावरील कृती कार्यक्रमात समावेश करून त्यावर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतील, असे म्हैसकर यांनी सांगितले.

..............................